मोटार चालवणाऱ्या महिलेला पक्षाघाताचा झटका येऊन तिची गाडी येथील एरवान ब्रह्मा हिंदू मंदिराच्या कुंपणावर जाऊन धडकली. यात सहा भक्तगण जखमी झाले असून त्यात परदेशी व्यक्तींचा समावेश आहे. मोटार चालवत असताना सदर महिलेला पक्षाघाताचा मोठा झटका आला व तिचे गाडीवरचे नियंत्रण सुटले, असे बँकॉकचे हंगामी पोलीस प्रमुख लेफ्टनंट जनरल सनीत महातोवर्न यांनी सांगितले.

मोटारीत या महिलेची मुलगी होती तिने सांगितले की, पक्षाघाताचा झटका आल्याने ही घटना घडली. डीएनए चाचणीनुसार महिलाच गाडी चालवत होती. फिकट निळ्या रंगाची सेडान मोटार मुख्य रस्त्यावरून घसरत गेली व मंदिराच्या दाराला धडकून आत गेली. थायलंडमध्ये याच मंदिराच्या ठिकाणी ऑगस्ट २०१५ मध्ये झालेल्या हल्ल्यात २० ठार, तर १२० जण जखमी झाले होते.

कालच्या मोटार आदळण्याच्या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण बघितले असता त्यात मोटार आदळल्यानंतर रिव्हर्स गिअरमध्ये होती असे दिसले कारण मुलीने गिअर लिव्हर ओढले होते. हा दहशतवादी हल्ला नव्हता, अपघात होता असे सांगण्यात आले. या घटनेत सहाजण जखमी झाल्याचे सांगण्यात आले असून त्यात इंडोनेशिया, सिंगापूर व चीन या देशांचा समावेश आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे.

महिलेचे सीटीस्कॅन करणाऱ्या डॉक्टरांनी तिला पक्षाघाताचा झटका आल्याचे सांगितले. त्या अवस्थेत चालक गाडी नियंत्रित करू शकत नाही, असे डॉक्टरांनी सांगितले तर गुन्हेगारी आरोप तिच्यावर ठेवले जाणार नाहीत नागरी आरोप ठेवले जातील असे पोलिसांनी सांगितले.