केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या २८ मे रोजी जाहीर होणार आहे. या परीक्षेसाठीच्या गुणांच्या पुनर्मुल्यांकनासंदर्भात काही दिवसांपासून वाद चालू होता. यावर दिल्ली उच्च न्यायालयाने प्रचलित गुण पुनर्मुल्यांकन पद्धत कायम ठेवण्याचा निकाल दिला होता. त्यानंतर सीबीएसई बोर्डाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील न करण्याचे ठरवल्यामुळे हा वाद तुर्तास शमला आहे. त्यामुळे बारावीचे निकालही जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला. सीबीएसईकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार २८ मे रोजी दुपारपर्यंत शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर होतील. http://www.results.nic.in , http://www.cbseresults.nic.in ,  http://www.cbse.nic.in या संकेतस्थळावर हे निकाल पाहता येतील.

गुण पुनर्मुल्यांकनासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सीबीएसई सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता हा तिढा सुटला आहे. यावर्षी देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमुळे १२ वीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र तरीही विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी अडचणी येऊ नयेत यासाठी हे निकाल वेळेत लावण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे. यावर्षी देशभरातून १०.९८ लाख विद्यार्थी सीबीएसईकडून बारावीच्या परीक्षेला बसले होते. यातील सर्वाधिक म्हणजेच अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी दिल्ली केंद्रातून होते.