चीनमधील माध्यमांचा कांगावा

गोव्यात अलीकडेच पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेत भारताने पाकिस्तानची कोंडी करून त्यांना परिणामकारक पद्धतीने नामोहरम केले आणि स्वत:ला प्रकाशझोतात आणून एनएसजी सदस्यत्व आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळविण्यासाठीचा आपला दावा अधिक बळकट केला, असे वृत्त चीनमधील माध्यमांनी दिले आहे.

पाकिस्तानला वगळून भारताने प्रदेशातील सर्व देशांना निमंत्रित केले आणि पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, असे ‘इंडिया युझेस ब्रिक्स टू आऊटमॅनोव्हर पाकिस्तान’ या शीर्षकाखाली ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांत म्हटले आहे.

उरी हल्ल्यानंतर इस्लामाबादमध्ये भरणाऱ्या सार्क शिखर परिषदेला हजर न राहण्याचा निर्णय भारताने घेतला त्याचा संदर्भ देऊन म्हटले आहे की, सार्क परिषद रद्द झाल्याने पाकिस्तानच्या मनात प्रादेशिक गटांबद्दल असलेल्या शंकांपासून दूर राहण्याची भारताला एक संधी मिळाली आणि तोच गट लवकरच पाकिस्तानच्या अनुपस्थितीत गोव्यात एकत्र आला, असेही माध्यमांनी म्हटले आहे.

गोव्यातील परिषद आणि त्यापूर्वी झालेली परिषद यामध्ये मोठा फरक हा आहे की, भारताने ब्रिक्स परिषदेशी बिमस्टेक (द बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टिसेक्टरल टेक्निकल अॅण्ड इकॉनॉमिक कोऑपरेशन) जोडला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावात ब्रिक्समधील अन्य सदस्य कोणत्याही एका देशाच्या बाजूने खुलेपणाने मत मांडणार नाहीत त्यामुळे भारताने कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्याच्या अधिकारांचा वापर करून पाय रोवला, असेही लेखांत म्हटले आहे.

या परिषदेमुळे भारताला एनएसजीचे सदस्यत्व मिळविण्यासाठीचा दावा अधिक मजबूत करण्यास आणि संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळविण्यास मदत होणार आहे. एनएसजी गटातील भारताचा प्रवेश चीनने रोखला आहे.