अध्यक्ष क्षी जिनगिंप यांच्या नेतृत्वाखाली चिनी लष्करात मोठे स्थित्यंतर घडत असून ताज्या दमाचे सैन्य नवी आव्हाने पेलण्यास सज्ज होत आहे.

पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) नावाने ओळखल्या जाणाऱ्या चीनच्या लष्कराचा रविवारी ८९वा स्थापना दिन साजरा होत आहे. २३ लाख सैनिक असलेले चीनचे लष्कर जगातील सर्वात मोठे सैन्य आहे. चीनचा वार्षिक लष्करी अर्थसंकल्प १४५ अब्ज डॉलरच्या घरात असून अमेरिकेपाठोपाठ सेनादलांवर खर्च करणारा चीन जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

गेल्या दशकभरात सुरू असलेल्या चिनी लष्कराच्या आधुनिकीकरणाला अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली २०१३ पासून विशेष गती मिळाली आहे. चिनी पीएलएचे वैशिष्टय़ म्हणजे त्याचे नियंत्रण सरकारकडे नसून कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना या सत्ताधारी पक्षाकडे आहे. त्यावरील पकड मजबूत करण्यासाठी जिनपिंग यांनी सेंट्रल मिलिटरी कमिशनची स्थापना करून स्वत:ला लष्कराचे सर्वोच्च सेनापती (कमांडर-इन-चीफ) घोषित केले आहे.

याव्यतिरिक्तही लष्कराच्या रचनेत आणि कार्यपद्धतीत जिनपिंग यांनी मोठे बदल घडवले आहेत. लष्कराला नवी आणि आधुनिक शस्त्रास्त्रे उपलब्ध करून देण्याबरोबरच त्याच्या प्रशिक्षणातही आमूलाग्र बदल केले आहेत.

लष्कराला लागलेली भ्रष्टाचाराची कीड संपण्यावर विशेष भर देत दोन निवृत्त सेनापतींसह ४० वरिष्ठ  लष्करी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत चौकशी आणि कारवाई केली आहे. हे सेनापती वरिष्ठ पदांवर बढतीसाठी कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणात लाच घेत असल्याचा आरोप आहे. अशाच एका प्रकरणात माजी सेनापती ग्वो बोझिआँग यांना आजन्म कारावासाची शिक्षा देण्यात आली. त्यांच्यावर २३ लाख डॉलरची लाच घेतल्याचे आरोप आहेत.

आगामी काळातील जगातील महासत्ता म्हणून चीन आपल्या प्रगतीकडे पाहत असून त्या पदाला साजेसे सेनादल उभे करण्यावर चीनचा भर आहे. तसेच दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या दाव्यामुळे अमेरिकेसह अन्य शेजारी देशांबरोबर नजीकच्या भविष्यकाळात संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने सेनादलांच्या आधुनिकीकरणाचा व फेररचनेचा वेग चीनने वाढवला आहे.