चीनमध्ये एका ब्लॉगरला इंटरनेटवर अफवा पसरवल्याच्या प्रकरणी तीन वर्षे कारावासाची शिक्षा झाली आहे. सरकारने अफवेखोरांच्या विरोधात केलेल्या कारवाईत शिक्षा सुनावण्यात आलेले क्विन झिहुई हे पहिले ब्लॉगर असून सरकारने चीनच्या सामाजिक प्रसार माध्यमांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेकडो लोकांना अटक केली होती.
क्विन झिहुई यांच्यावर सरकारी यंत्रणेबाबत अफवेवर आधारित प्रक्षोभक माहिती सामाजिक प्रसार माध्यमातून प्रसृत केली होती, त्यामुळे अशांतता निर्माण झाली.
चीनने म्हटले आहे, की वर्षभरापूर्वी सामाजिक प्रसारमाध्यमांच्या मदतीने (सोशल नेटवर्किंग संकेतस्थळे) अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती.
हक्क गटांनी सरकारवर असा आरोप केला की, चीनने ऑनलाइन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच केला आहे.
बीजिंग जिल्हा न्यायालयात फिर्यादी पक्षाने सांगितले, की क्विन यांनी पसरवलेल्या अफवेमुळे सामाजिक व्यवस्थेला धोका निर्माण झाला. ‘सिना वेबो’ या ट्विटरसारख्या मायक्रोब्लॉग संकेतस्थळावरून त्यांनी अफवा पसरवली. अनेक चुकीच्या बातम्या त्यावर टाकल्या त्यात चीनने रेल्वे अपघातातील एका मृत परदेशी प्रवाशाच्या नातेवाइकांना ३२.२ दशलक्ष डॉलर भरपाई देण्यात आली. क्विन हा ब्लॅक पीआर आस्थापनेचे संचालन करीत होता. काही कंपन्यांकडून पैसे घेऊन त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांविरुद्ध अभिप्राय टाकत होता. त्याने गुन्हा कबूल केला असून सुनावणीच्या वेळी माफी मागितली आहे.
चिनी-अमेरिकी ब्लॉगर चार्लस स्यू यांना जामिनावर सोडणयात आले. वेश्याव्यवसायात ते गुंतले असल्याचा संशय होता. साठ वर्षे वयाचे स्यू यांचे १.२० कोटी अनुसारक वेबोवर होते व त्यांनी दूरचित्रवाणीवर जाहीर माफी मागितली. आता त्यांचा समाजाला धोका राहिलेला नाही, असे सरकारनेच सांगितले असे ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राने म्हटले
आहे.
गेल्या सप्टेंबरमध्ये चीनने लागू केलेल्या र्निबधानुसार जर कुणी बदनामीकारक संदेश लिहिले व ५०० वेळा पुन्हा पाठवले तर अशा व्यक्तींना तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा केली जाईल. जर आक्षेपार्ह संदेश पाच हजार वेळा पाहिले गेले तर ते पाहणाऱ्यांना शिक्षा होऊ शकते. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या मते शेकडो ब्लॉगर्सना चीनने अटक केली
आहे.