अमेरिकेत नुकताच झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी करण्यासाठी रशियाने मोठी मदत केली असल्याचा खळबळजनक निष्कर्ष अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएने काढला आहे. परंतु नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यालयाकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्राने एका अमेरिकन सिनेटरांना देण्यात येणाऱ्या गोपनीय अहवालांची माहिती असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत एका उमेदवाराला मदत करण्याची रशियाची योजना होती. त्यामुळे त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी करण्यासाठी मदत केल्याचा निष्कर्ष सीआयएने काढला आहे.

या अहवालात म्हटले आहे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत हस्तक्षेप करून त्यांची निवडणूक प्रक्रिया कमजोर करणे इतकाच रशियाचा उद्देश नव्हता तर डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी करण्यासाठीही त्यांनी हस्तक्षेप केला, असा निष्कर्ष सीआयएने काढला आहे. परंतु ट्रम्प यांच्या कार्यालयाने मात्र ही गोष्ट फेटाळली आहे.