जमियत उलेमा-ए-हिंद या सामाजिक धार्मिक संघटनेने यंदाचे ईद मिलन रद्द केले आहे. देशातील सध्याच्या धार्मिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ईद मिलनाचा कार्यक्रम रद्द करत असल्याचे जमियत उलेमा-ए-हिंदने म्हटले आहे. ३० जून रोजी जमियत उलेमा-ए-हिंदकडून ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र देशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता हा कार्यक्रम रद्द करत असल्याची घोषणा जमियत उलेमा-ए-हिंदकडून करण्यात आली आहे.

‘सध्याची देशातील परिस्थिती अतिशय वाईट आहे. प्रवास करताना, रस्त्यावरुन जाताना कोणी काही टिप्पणी केल्यास त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका, अशा सूचना मुलांना देण्याची वेळ आमच्यावर आली आहे,’ असे जमियत उलेमा-ए-हिंदचे सचिव महमूद मदानी यांनी इंडियन एक्स्प्रेससोबत बोलताना दिली. ‘मुस्लिमांना वाईट समूजन त्यांना लक्ष्य केले जात असल्याची मला सर्वाधिक भीती वाटत नाही. मात्र यामुळे आपण आपल्या मुलांना कट्टरतावादाकडे नेत आहोत, याची मला सर्वाधिक भीती वाटते,’ असेदेखील मदानी यांनी म्हटले.

‘जमावाकडून मारहाण झाल्याच्या आणि त्यामध्ये लोक मृत्यूमुखी पडल्याच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत. देशात एका समुदायाची संख्या सर्वाधिक आहे आणि त्या समुदायाचे प्राबल्य दाखवण्यासाठी अल्पसंख्यांकांना लक्ष्य करण्यात येत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला पंगू करता येऊ शकते, हे दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकार अल्पसंख्यांकांचा बचाव करु शकत नाही, हे वारंवार दाखवले जाते आहे. सरकारदेखील अल्पसंख्यांकांच्या बचावासाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर ईद मिलनाचा कार्यक्रम रद्द करण्याचा दु:खद निर्णय घ्यावा लागला,’ असे महमूद मदानी यांनी सांगितले.

जमियत उलेमा-ए-हिंदकडून ईद मिलनाचा कार्यक्रम रद्द करण्यामागे देशातील वातावरण गढूळ करण्याचा हेतू नाही, असे महमूद मदानी यांनी स्पष्ट केले. गोतस्करी करत असल्याच्या, गोहत्येच्या संशयातून कथित गोरक्षकांकडून मुस्लिम समाजातील व्यक्तींवर हल्ले झाल्याच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये वाढ झाली आहे. गायींची वाहतूक करणाऱ्या अनेक मुस्लिमांना मारहाण करण्यात आल्याच्या घटना देशभरात घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जमियतच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती.