दगडफेकीच्या घटनांमुळं अशांत असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे मंगळवारी आंदोलक विद्यार्थ्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसंच त्यांनी पोलिसाची मोटरसायकल पेटवून दिली.

दगडफेकीच्या घटनांप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सहकाऱ्यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी करत पुलवामातील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक केली. आंदोलक विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. याचदरम्यान साध्या वेशातील एका पोलीस कर्मचाऱ्याला विद्यार्थ्यांनी अडवले आणि त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याची मोटरसायकल पेटवून दिली. विद्यार्थ्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या पोलिसाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं दिली.

जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिन्यात श्रीनगर येथील लाल चौक परिसरातील तीन शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. एसपी महाविद्यालय, महिला शासकीय महाविद्यालय आणि एस पी उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मौलाना आझाद रोडवर आंदोलन केले होते. विद्यार्थ्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेकही केली होती. आंदोलनात विद्यार्थिनींचाही मोठा सहभाग होता. रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांनी ‘आझादी’च्या घोषणाही दिल्या होत्या. त्याआधी १५ एप्रिलला झालेल्या आंदोलनानंतर पुलवामातील शासकीय महाविद्यालयावर कारवाई करण्यात आली होती. काश्मीर खोऱ्यातील महाविद्यालये आठवडाभर बंद ठेवण्यात आली होती. ती पुन्हा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.