भारतीय संशोधकासह अन्य शास्त्रज्ञांनी पोस्ट तिकिटाच्या आकाराची एक चिप शोधून काढली असून त्यात मानवी मेंदूतील कोटय़वधी न्यूरॉन्सचे सादृश्यीकरण करण्यात आले आहे.
  या चिपमध्ये ५.४ अब्ज ट्रान्झिस्टर्स (इलेक्ट्रॉनिक घटक) असून त्यामुळे १० लाख न्यूरॉन व मेंदूतील २५.६ कोटी जोडण्या म्हणजे सिनॅप्सेसचे सादृश्यीकरण केले  आहे. मेंदूतील अनेक प्रक्रियांची नक्कल यात केली असून यातील एक चिप टाइलच्या आकाराची असते ती मानवी मेंदूसारखे काम करू शकते. संशोधकांच्या मते ट्र नॉर्थ या चिपचा वापर पारंपरिक संगणकांना आव्हानात्मक ठरणार आहे. त्यात कुठल्याही पदार्थाच्या व व्यक्तींच्या प्रतिमा ओळखता येतात.
आयबीएमच्या कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथे असलेल्या संशोधन प्रयोगशाळेतील मुख्य बोधन संशोधक व व्यवस्थापक धर्मेद्र मोढा यांनी सांगितले की, आम्ही मेंदू तयार केलेला नाही. मेंदूची रचना तयार केली आहे.
आयबीएमची नवीन चिप ही आकाराने जिवंत मेंदूसारखी आहे, त्यात २५६ इनपुट लाइन असलेली कोअर्स म्हणजे मेंदूच्या संदर्भात अ‍ॅक्सॉन आहेत. चेतापेशीचे हे वायरसारखे भाग असतात व ते विद्युत संदेश वाहून नेत असतात व  यात २५६ आउटपुट म्हणजे मेंदूच्या संदर्भात न्यूरॉन्स असतात. ही चिप मेंदूसारखीच असून त्यात कृत्रिम न्यूरॉन संदेश पाठवतात पण त्यासाठी त्यांना विद्युत भार मिळावा लागतो.
 संशोधकांनी अशी चार हजार कोअर जोडून ही एक चिप तयार करून तिची कामगिरी तपासली असता ही चिप प्रतिमा व चेहरे ओळखू शकते, त्यामुळे संगणकात बसवल्यानंतर ती चिप, सायकलस्वार, मोटारी, इतर वाहने यांची छायाचित्रे व इतर पदार्थही ओळखू शकेल. आयबीएमच्या यूएस डिफेन्स रीसर्च प्रोजेक्ट एजन्सीच्या सिनॅप्स  कार्यक्रमात ही चिप तयार करण्यात आली असून सस्तन प्राण्याच्या मेंदूप्रमाणे काम करू शकेल व किमान उंदीर, मांजराइतकी बुद्धिमत्ता असेल असा संगणक तयार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.