कोंगोच्या नागरिकाची दिल्लीत हत्या करण्यात आली त्याबद्दल संताप व्यक्त करून आफ्रिकेतील देशांच्या प्रतिनिधींनी वर्णद्वेष आणि आफ्रिकेबद्दल वाटणारी घृणा या विरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
भारतात साजरा करण्यात येणाऱ्या आफ्रिका दिनाचा कार्यक्रम पुढे ढकलावा अशी मागणीही करण्यात आली असून भारताने आफ्रिकेच्या नागरिकांच्या सुरक्षेची हमी दिली आहे.
कोंगोचा नागरिक मासोंदा केतडा ऑलिव्हर याची गेल्या आठवडय़ात हत्या करण्यात आली होती त्याबद्दल आफ्रिकेतील विविध देशांच्या मुत्सद्दय़ांनी संताप व्यक्त केला. भारताच्या वतीने आयोजित आफ्रिका दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि आफ्रिकन नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात पावले उचलण्याची मागणी केली. आफ्रिकेतील ४२ देशांच्या प्रतिनिधींनी आपल्या देशातील नागरिकांवर अलीकडेच झालेल्या हल्ल्यांबाबत सविस्तर चर्चा केली. भारत सरकारने हल्ले थांबविण्यासाठी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्याबरोबरच सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी आफ्रिकेच्या शिष्टमंडळाचे प्रमुख सेहागे वोल्डमरियम यांनी केली. कोंगोच्या नागरिकाच्या हत्येत सहभागी असलेल्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले.