काँग्रेसकडून विशेष तपास पथकाची मागणी; आरोपात तथ्य नसल्याचे भाजपचे स्पष्टीकरण
गुजरातमधील भूखंड वाटपावरून काँग्रेसने शनिवारी अधिक आक्रमक होत भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना करण्यात आलेल्या सर्व शासकीय भूखंड वाटपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालील विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना आणि आनंदीबेन पटेल या महसूलमंत्री असताना ज्या शासकीय भूखंडांचे वाटप करण्यात आले, त्या सर्वाची या पथकाने चौकशी केली पाहिजे, असे काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी दिल्लीत वार्ताहरांना
सांगितले.
मोदी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत सार्वजनिक आणि वनखात्याच्या भूखंडांची लूट करण्यात आली, असा आरोपही शर्मा यांनी केला.

सरकारकडून लाभ घेतलेला नाही- अनार पटेल
अहमदाबाद: गुजरात राज्य सरकारकडून आपण कोणताही लाभ घेतलेला नाही, असे स्पष्ट करून गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची कन्या अनार हिने काँग्रेसने केलेल्या आरोपांचे जोरदार खंडन केले.वाइल्डवुड रिसॉर्ट अ‍ॅण्ड रिअल्टीज प्रा. लि., अनिल इन्फ्राप्लस अ‍ॅण्ड पाश्र्वटेक्सकेम या कंपन्यांची आपण संचालक अथवा समभागधारकही नाही, याबाबत कोणीही सरकारी दस्तऐवजांची पाहणी करून खातरजमा करून घ्यावी, असे अनार पटेल यांनी फेसबुकवर म्हटले आहे. दक्षेसभाई आणि अमोल श्रीपाल हे आपले व्यावसायिक भागीदार आहेत, मात्र याचा अर्थ आपण त्यांच्या कंपनीत आहोत असा होत नाही, असेही अनार यांनी म्हटले आहे.

भाजपने आरोप फेटाळले
स्वपक्षीयांच्या भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्यासाठी काँग्रेस गुजरातमधील भूखंड वाटप प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निराधार आरोप करीत असल्याचा आरोप भाजपने केला.खोटेनाटे आरोप करण्यात काँग्रेस पक्ष पटाईत आहे, त्यांच्या पक्षाचे नेते भ्रष्टाचारात बुडालेले असल्याने भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर चर्चा करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असेही भाजपने म्हटले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज होऊ न देण्याचा काँग्रेसचा इरादा आहे, असेही भाजपने म्हटले आहे.