राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा येईल अशी चर्चा सुरू असतानाच, काँग्रेसने संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. नव्या पक्षाध्यक्षांची निवड ३० सप्टेंबपर्यंत होईल.
दोन टप्प्यांत या निवडणुका होतील. पहिल्या टप्प्यात १८ राज्ये व केंद्रशासित प्रदेश व दुसऱ्या टप्प्यात जवळपास तेवढीच राज्ये आहेत. ३१ जुलैपर्यंत पहिला टप्पा होईल. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात समावेश आहे. सोनिया गांधी या पक्षाच्या इतिहासात सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिल्या आहेत. येत्या १४ मार्च रोजी सोनियांच्या काँग्रेस अध्यक्षपदाला १७ वर्षे पूर्ण होतील. १९९८ मध्ये सीताराम केसरी यांच्याकडून कठीण स्थितीत त्यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्ष संघटना बळकट करण्याचे पुन्हा एकदा आव्हान आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार सदस्य नोंदणीची मुदत १५ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानंतर संबंधित जिल्हा काँग्रेस समित्या प्राथमिक सदस्यांच्या मतदार याद्या प्रसिद्ध करतील.