मूर्तीचे विसर्जन आणि अन्य धार्मिक विधी करण्यासाठी यमुना नदीच्या तीरावर विशेष घाट उभारावे, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने जलसंपदा, पूरनियंत्रण विभाग आणि अन्य संबंधितांना दिले आहेत. धार्मिक विधी पार पाडल्यानंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावता येईल, असेही लवादाने म्हटले आहे.

लवादाचे अध्यक्ष न्या. स्वतंत्रकुमार यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने अलीकडेच या बाबत आदेश दिला. यमुना नदीत पूजेचे साहित्य किंवा अन्नधान्य, तेल यासारखे घटक फेकण्यास पीठाने र्निबध घातले आहेत.
नदीच्या तीरावर विशेष घाट उभारावे म्हणजे तेथे भाविकांना पूजाविधीचे साहित्य फेकता येईल अथवा मूर्तीचे विसर्जन करता येईल आणि त्यानंतर संबंधित प्राधिकरणाकडून ते घाट स्वच्छ करून कचऱ्याची योग्य प्रकारे आणि त्वरित विल्हेवाट लावता येईल, असे आदेश लवादाने दिले आहेत.
नदीच्या मुख्य प्रवाहात कोणतेही घटक फेकले जाणार नाहीत याची खबरदारी सर्व संबंधितांनी घ्यावयाची असून त्यासाठी पडदे लावणे अथवा अडथळे उभारणे अशा तांत्रिक उपाययोजना करता येतील, असेही लवादाने स्पष्ट केले आहे. यमुनेच्या तीरावर पडलेला कचरा उचलण्यासाठी लवादाने संबंधितांना चार महिन्यांची मुदत दिली आहे.