सांस्कृतिक वाद आणि भगवेकरणामुळे भारताच्या आर्थिक विकासाला खीळ बसली आहे, असा निष्कर्ष अमेरिकास्थित थिंक टँककडून काढण्यात आला आहे. सांस्कृतिक वाद आणि भगवेकरण या दोन घटकांमुळे मोठ्या सुधारणांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) सरकार लोकांच्या नव्या भारताविषयीच्या अपेक्षांची पूर्ती करण्यात अपयशी ठरल्याचे मत या थिंक टँककडून व्यक्त करण्यात आले आहे.
वॉशिंग्टनस्थित हडसन संस्थेकडून मोदी सरकारच्या दोन वर्षातील कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. भारताला  महागाईची समस्या नियंत्रणात आणण्यात यश मिळाले आहे. मात्र, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, मुलूभत सुविधांमध्ये सुधारणा आणि लालफितीचा सरकारी अडथळा दूर केल्यास भारतीय अर्थव्यवस्था विकासाचा दोन अंकी विकासदराचा आकडा गाठू शकते, असा विश्वास संस्थेकडून व्यक्त करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी सरकारने जीएसटी विधेयक मंजूर करून महत्त्वपूर्ण सुधारणांची मुहूर्तमेढ रोवली आहे.  राज्यसभेत मंजूर झालेल्या या विधेयकामुळे येत्या काही काळात भारतीय बाजारपेठेला आवश्यक गती प्राप्त होईल, असेही संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. तसेच भारताला ब्रिटीशकालीन रेल्वे, रस्ते, हवाई वाहतूक आणि बंदराच्या ठिकाणच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि आणि बदल करण्याची गरज अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. भारताने अधिक खुले होण्याची आणि केवळ आर्थिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित असणाऱ्या परंतु, साचेबद्ध नसलेल्या समाजाची गरज आहे. मात्र, गेल्या दोन वर्षात सांस्कृतिक वाद आणि भगवेकरणामुळे सुधारणा हळू गतीने पुढे जात आहेत, असे थिंक टँकने म्हटले आहे.