काश्मीरमध्ये हिज्बुलचा कमांडर बुरहान वानी याच्यासह दोन दहशतवाद्यांचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर पंधरा दिवसाहून अधिक काळ तेथे हिंसाचार झाला . त्यानंतर काही काळ संचारबंदी काल उठवली असताना दक्षिण काश्मीरमधील चार जिल्ह्य़ात तसेच श्रीनगर येथे शुक्रवारी ती पुन्हा लागू करण्यात आली. फुटीरतावाद्यांच्या नियोजित मोर्चामुळे संचारबंदी लागू करणे भाग पडले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग, कुलगामस पुलवामा व शोपिया जिल्ह्य़ात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले, की उत्तर काश्मीरमध्ये व मध्य काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांनी जामिया मशिदीपर्यंत मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. काश्मीर खोऱ्यातील हिंसाचारात मरण पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जामा मशिद येथे जमण्याचे आवाहन फुटीरतावाद्यांनी केले आहे. काश्मीर खोऱ्यात ९ जुलैपासून निदर्शने सुरू असून हिज्बुलचा कमांडर बुरहान वानी हा सुरक्षा दलांशी चकमकीत मारला गेल्यानंतर ती सुरू झाली व त्यात हिंसाचारही झाला. निदर्शक व सुरक्षा दले यांच्यातील चकमकीत आतापर्यंत ४७  ठार तर ५५०० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन पोलिसांचा समावेश आहे. काल अधिकाऱ्यांनी संपूर्ण काश्मीर खोऱ्यातील संचारबंदी अनंतनाग वगळता उठवली होती कारण परिस्थिती सुधारली होती. संपूर्ण काश्मीर खोऱ्यात मोबाईल सेवा बंद असली तरी पोस्टपेड सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान काश्मीर  खोऱ्यात लागोपाठ २१ व्या दिवशी जनजीवन विस्कळित राहिले.

काश्मिरात फुटीरवादी नेत्यांना अटक

श्रीनगर – आपल्या निवासस्थानाहून शहरातील ऐतिहासिक जामिया मशिदीकडे निघालेल्या सैयद अली शाह गिलानी व मिरवाईझ उमर फारूक या दोन फुटीरवादी नेत्यांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

गिलानी यांनी नजरकैदेचा आदेश धुडकावल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक करून हुमहामा पोलीस ठाण्यात नेल्याचे कट्टरवादी हुरियत कॉन्फरन्सच्या प्रवक्त्याने सांगितले. मवाळवादी हुरियत कॉन्फरन्सचे नेते मिरवाईझ उमर फारूक यांनी शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी जामिया मशिदीकडे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांनाही अटक करून निजीन पोलीस ठाण्यात नेले, अशी माहिती या गटाच्या प्रवक्त्याने दिली.