दार्जिलिंगमधील हिंसाचारप्रकरण; आंदोलनादरम्यान रुग्णवाहिका सेवांवर परिणाम, टीव्ही केबल जोडण्या तोडल्या

स्वतंत्र गोरखालॅण्डच्या मागणीसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चाने सुरू केलेल्या आंदोलनाच्या आठव्या दिवशी दार्जिलिंग भागातील रुग्णवाहिका सेवांवर परिणाम झाला, तर काही भागांत टीव्ही केबलच्या जोडण्या तोडण्यात आल्या. दरम्यान, दार्जिलिंगमध्ये झालेल्या हिंसाचारातील सहभागाबद्दल संघटनेचे प्रमुख बिमल गुरंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीजेएमच्या आवाहनानुसार सुरू झालेल्या या बंदमध्ये गेल्या शनिवारी संघटनेचे कार्यकर्ते व सुरक्षा दले यांच्यात व्यापक संघर्ष झाला होता. गुरुवारी कुठेही अप्रिय घटना घडली नाही, मात्र अडवणुकीच्या भीतीने रुग्णवाहिकांचे चालक रुग्णांची वाहतूक करण्यास नकार देत आहेत.

दार्जिलिंगच्या काही भागात सकाळपासून स्थानिक केबल टीव्हीच्या जोडण्या तोडून टाकण्यात आल्या. हिंसाचारासाठी चिथावणी देणाऱ्या अफवा पसरणे थांबवण्यासाठी या भागातील इंटरनेट सेवाही सलग पाचव्या दिवशी स्थगित होत्या. सकाळपासून पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली आहे.

पश्चिम बंगाल सरकारने गुरुवारी सिलिगुडीत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, मात्र सर्व पर्वतीय पक्षांनी तिच्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. आंदोलनामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असतानाच, विद्यार्थ्यांना सिलिगुडी व रोंगपो येथे सुरक्षितपणे हलवण्याकरिता जीजेएमने सर्व शाळांना २३ जूनला १२ तासांची ‘मोकळीक’ देण्याचा प्रस्ताव ठेवला.

दरम्यान, स्वतंत्र गोरखालॅण्डच्या मागणीसाठीच्या आंदोलनातील हिंसाचार, जाळपोळ व चकमकीत एका जणाचा मृत्यू यांतील सहभागाबद्दल गोरखा जनमुक्ती मोर्चाचे सर्वेसर्वा बिमल गुरुंग व त्यांची पत्नी आशा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. त्यावर, पोलिसांनी या दोघांना खोटय़ा प्रकरणात गोवले असल्याची प्रतिक्रिया जीजेएमच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.