उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताकडून लष्करी कारवाई करण्याची शक्यता नसताना शेजारच्या पाकिस्तानातील वृत्त वाहिन्यांवर मात्र भारतीय सैन्याचा सामना कसा करायचा, यावर चर्चा सुरू आहे. पाकिस्तानी वृत्त वाहिन्यांवर चालणाऱ्या चर्चा आणि दाखवली जाणारी वृत्त यांच्यात फक्त तथ्यांचाच अभाव नाही तर हे सगळेच कार्यक्रम अत्यंत हास्यपद आहेत.

बलुचिस्तान, बुरहान वाणी आणि काश्मीरमधील अस्थिरता या मुद्यांवर सध्या पाकिस्तानी वृत्त वाहिन्यांवर तावातावाने चर्चा सुरू आहे. यातील एका वाहिनीने तर कारगिल युद्धातील पाकिस्तानी सैन्याच्या कामगिरीची तुलना यशासोबत करुन टाकली आहे. भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास त्यांची अवस्था कारगिलसारखी होईल, असा अजब इशारा या वृत्त वाहिनीकडून देण्यात आला आहे. सत्य आणि तथ्यांचा अभाव असणारे एकापेक्षा एक उत्तम नमुने पाकिस्तानी वृत्त वाहिन्यांकडून पेश केले जात आहेत.

भारतीय लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग पाकिस्तानला घाबरतात : एका व्हिडीओमध्ये पाकिस्तानी वृत्त निवेदिकेने पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांच्या एका वक्तव्याचा आधार घेतला आहे. “पाकिस्तानवर हल्ला करायचा विचार केला तर भारताला खूप मार खावा लागेल”, असे विधान या वृत्त निवेदिकेने केले आहे. या वृत्त निवेदिकेला कदाचित १९६५ आणि १९७१ चा विसर पडला असावा.

कारगिल लक्षात ठेवा : एका उर्दू वृत्त वाहिनीने तर चक्क इतिहासच बदलून टाकला आहे. पाकिस्तानवर हल्ला करण्यापूर्वी भारताने कारगिलचे युद्ध आठवून पाहावे, असा अजब सल्ला या वृत्त वाहिनीने दिला आहे. कारगिल युद्धात ज्यावेळी भारताने एलओसी ओलांडली, त्यावेळी पाकिस्तानने भारताचे विमान पाडले होते, असेदेखील या वाहिनीने म्हटले आहे. मात्र कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला कशाप्रकारे पाणी पाजले होते, हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. मात्र पाकिस्तानला याचा विसर पडला आहे.

नवाझ शरीफ यांचे संयुक्त राष्ट्रातील अपयश : पाकिस्तानी वृत्त वाहिनीवरील चर्चेतील पाहुणे काश्मीर प्रश्न सोडवता न आल्याने पाकिस्तानच्या संसद सदस्यांना लक्ष्य करत आहेत. पाकिस्तानच्या संसद सदस्यांच्या विविध समित्यांनी जगभरातील देशांना भेट देऊन भारताच्या क्रूर चेहऱ्याचा पर्दाफाश करावा, अशी चर्चेत सहभागी झालेल्या पाहुण्यांची इच्छा आहे. यातील एका पाहुण्याने तर नवाझ शरीफ यांच्यावरही टीका केली आहे. “शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रात हातात कागदपत्रे घेऊन बोलायला हवे होते. तुम्ही हात हलवत गेल्यावर लोक तुम्हाला गांभीर्याने घेत नाहीत”, अशी टीका या चर्चेत सहभागी झालेल्या या पाहुण्याने केली आहे.

उरी हल्ला काश्मीरमधील अस्थिरतेवरील लक्ष हटवण्यासाठी : ज्यावेळी नवाझ शरीफ संयुक्त राष्ट्रात अस्वस्थ काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणार होते, त्यावेळीच उरीत हल्ला झाला, असे विश्लेषण 92 HD या वृत्त वाहिनीकडून करण्यात आले आहे . उरी हल्ल्यामुळे काश्मीरच्या मुद्यावरुन सर्वांचे लक्ष विचलित झाले आणि पाकिस्तानचा संबंध दहशतवादाशी जोडला गेला, असेही या वृत्त वाहिनीने म्हटले आहे.