दिल्ली महिला आयोगाच्या सदस्य सचिवपदी दिलराज कौर यांची निवड केल्यामुळे नाराज असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यावर निशाणा साधला असून त्यांची हिटलरशी तुलना केली आहे. नायब राज्यपाल हिटलरप्रमाणे वागत आहेत. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या इशाऱ्यावर ते काम करत आहेत. त्यांनी पंतप्रधानांना आपला सन्मान विकला आहे, अशा प्रकारचे ट्विट त्यांनी केले आहे. त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट करून जंग यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. ते म्हणाले, उपराष्ट्रपती बनण्यासाठी जंग यांनी आपली आत्माही मोदी यांना विकली आहे. जंग यांनी कितीही प्रयत्न केले तरी मोदी कधीही एखाद्या मुस्लिम व्यक्तीस उपराष्ट्रपती बनवणार नाहीत.

नुकताच महिला आयोगाच्या सदस्य सचिव नियुक्तीवरून केजरीवाल आणि जंग यांच्या पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. केजरीवाल यांनी याच पदासाठी पूर्वी अलका दिवाण यांच्या नियुक्तीला अवैध ठरवले होते. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी अलका दिवाण यांच्या नियुक्तीमुळे आयोगाच्या कामकाजात अडथळा निर्माण होईल आणि त्याच्या स्वायत्तेस नुकसान पोहोचेल असे म्हटले होते.
यापूर्वी केजरीवाल यांनी नजीब जंग यांच्यावर ते केंद्राचे एजंट असल्याचा आरोप केला होता. जंग आणि केजरीवाल यांच्या अनेक विषयांवरून मतभेद आहेत.
नजीब जंग यांनी यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात दिल्ली वक्फ बोर्ड रद्द करून ते पुन्हा एकदा गठीत करण्याचा आदेश दिला होता. वक्फ बोर्डशी निगडीत भ्रष्टाचाराची चौकशी सीबीआय करेल. त्यांनी बोर्डच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्तीही अवैध ठरवली होती. त्यांनी वक्फ बोर्डचे सर्व अधिकारी महसूल सचिवांकडे सोपवले होते. त्याचबरोबर पर्यावरण आणि वन विभागाचे विशेष सचिव एस. एम. ओली यांच्याकडे दिल्ली वक्फ बोर्डच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. वक्फ बोर्ड पाच वर्षांसाठी गठीत करण्यात येते. वर्षे २०११ मध्ये दिल्ली सरकारने गठीत केलेल्या वक्फ बोर्ड गठीत केले होते. त्यांचा कार्यकाळ डिसेंबर महिन्यात पूर्ण होणार होता. परंतु भ्रष्टाचाराच्या तक्रारीमुळे बोर्डच्या सात सदस्यांपैकी पाच जणांनी राजीनामा दिल्यानंतर नायब राज्यपालांनी वक्फ बोर्ड भंग केले होते.