भारतात काहीही होऊ शकते, याचा आणखी एक नमुना गुरुवारी दिल्ली मेट्रोमध्ये दिसला. मेट्रोचे दरवाजे बंद न करताच ती एका स्थानकातून दुसऱया स्थानकात नेल्याची गंभीर घटना गुरुवारी सकाळी घडली.
साधारणपणे एक मिनिट २५ सेकंद या मेट्रोचे सर्वच्या सर्व दरवाजे उघडेच होते. या घटनेची गंभीर दखल घेत दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने संबंधित गाडीच्या मोटारमनला तातडीने निलंबित केले आहे. दिल्ली मेट्रोच्या जहांगीरपुरी ते हुडा सिटी सेंटर या यलो लाईनवर ही घटना घडली. मेट्रोचे दरवाजे उघडे राहिले त्यावेळी ती अर्जानगढहून घितोर्नी स्थानकाकडे निघाली होती. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मोटारमनच्या अक्षम्य चुकीमुळेच हा प्रकार घडल्याचे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने काढलेल्या निवेदनात म्हटले आहे.