पाकिस्तान सरकारच्या विरोधात शुक्रवारी नवव्या दिवशीही निदर्शने सुरू राहिली. वाटाघाटीकर्ते व निदर्शक नेते यांच्यातील मतभेद गंभीर बनले आहेत. पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी राजीनामा दिला तरच आपण चर्चा करू अशी मागणी निदर्शकांनी केली आहे. या निदर्शनांच्या वेळी रात्री उशिरापर्यंत रॉक संगीत व कव्वालीचे कार्यक्रम ठेवण्यात आले.
शरीफ यांनी काल असे सांगितले होते, की आपण निदर्शकांची धरपकड करण्याचे आदेशही देणार नाही व राजीनामाही देणार नाही. पंतप्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत इमरान खान व कॅनडाचे धर्मगुरू ताहिर उल काद्री यांनी राजधानीत राहण्याचा इरादा स्पष्ट केला आहे.
निदर्शकांनी गुरुवारी लाहोर येथून इस्लामाबादकडे कूच करीत रेड झोनमध्ये प्रवेश केला तेथे संसद भवन, पंतप्रधान निवासस्थान, राष्ट्रपती भवन व सर्वोच्च न्यायालय तसेच दूतावास इमारती आहेत. इमरान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाने तसेच धर्मगुरू काद्री यांनी संसद भवनाबाहेर निदर्शने केली. इमरान खान यांनी एका भाषणात सांगितले, की लोकांनी जास्त संख्येने जमून आठवडाअखेर सरकार बदलावे.
काद्री यांनी सांगितले, की या सरकारचा शेवट आता दूर नाही. रात्रीच्या निदर्शनावेळी संगीत व नृत्याचा वापर करण्यात आला. इमरान खान गटात सलमान अहमद या रॉक स्टारने करमणूक कार्यक्रम केले. काद्री यांनी कव्वाली कार्यक्रम ठेवला होता.
रात्री उशिरापर्यंत लोकांनी त्याचा आनंद घेतला. सरकारने निदर्शकांशी चर्चा करण्याची भूमिका जाहीर केली असली तरी त्यात कुठलाही सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही. विकासमंत्री अहसान इक्बाल यांनी सांगितले, की आम्ही प्रश्न सोडवण्यास तयार आहोत, पण त्यांची चर्चेची तयारी नाही. शरीफ यांना ११ राजकीय पक्षांचा पाठिंबा असून केवळ पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ त्यांच्या विरोधात आहे.