काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी लखनऊ येथील दहशतवाद्यांबरोबरील पोलिसांच्या चकमकीवरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. नोटाबंदीची घोषणा करताना पंतप्रधान मोदींनी दहशतवादी संपुष्टात येणार असल्याचे म्हटले होते. परंतु, प्रत्यक्षात असं झालंय का असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. टाइम्स नाऊ या वृत्त वाहिनीशी बोलताना मोदींवर हल्लाबोल केला.
नोटाबंदीमुळे दहशतवाद संपुष्टात येईल, असे म्हटले जात होते. पण वास्तवात दहशतवाद बंद झालाय का ? अखेर आयसिस मुस्लिम युवकांना आपल्या जाळ्यात का ओढत आहे ?, यावर विचार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. दोवाल यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, आपल्याकडे एक गुप्तहेर अधिकारी आहे. त्यांनी आपली संपूर्ण कारकीर्द दहशतवाद्यांशी लढण्यात घालवली असल्याचे बोलले जाते. परंतु, त्यांचे नेमके योगदान काय आहे ? असा सवाल प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला पाकिस्तानच्या आयएसआयकडून निधी मिळत असल्याचा आरोप कर्नल पुरोहित आणि आपटे यांच्या हवाल्याने त्यांनी केला. ते म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि पुणे बॉम्बस्फोट प्रकरणाचे आरोपी कर्नल पुरोहित आणि आपटे यांनी मोहन भागवत आणि इंद्रेश यांच्यावर आयएसआयकडून फंड मिळत असल्याचा आरोप केला होता. पुन्हा हा आरोप मी नाही तर त्यांचेच कार्यकर्ते करत असल्याची पुस्तीही त्यांनी या वेळी जोडत याचे उत्तर संघाने द्यावी, अशी मागणीही केली.
हिंदू असो किंवा मुस्लिम जो आपल्या देशासाठी धोकादायक आहे, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. पाकिस्तान भारतात असंतोष निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. एखादा युवक तालिबानबरोबर न जाता आयसिसकडे ओढला जाण्या मागचे काय कारण असू शकते. सोशल मीडियामुळेच मुस्लिम युवक आयसिसकडे खेचले जात आहेत. जर देशाचा विकास करायचा असेल तर गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींच्या विचारावर या देशाला जावे लागेल. प्रेम आणि अहिंसा हीच या देशाची नीती आहे, असेही ते म्हणाले.