लोकमान्यतेतही घसरण, गॅलप पोलचा निष्कर्ष

अमेरिकेतील आपल्यावर टीका करणारी सर्व प्रसारमाध्यमे खोटय़ा बातम्या देत असतात असा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार करीत असले, तरी त्यांचा हा दावा अमेरिकी नागरिकांना फारसा पटत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे ट्रम्प ज्या सीएनएन वाहिनीवर सातत्याने हल्ला करीत आहेत त्या वाहिनीच्या प्रेक्षकसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले असून, दुसरीकडे ‘गॅलप पोल’ या अमेरिकेतील सुप्रतिष्ठित सर्वेक्षण संस्थेने केलेल्या पाहणीनुसार ६८ टक्के नागरिकांना ट्रम्प हेच अप्रामाणिक असल्याचे वाटत आहे.

‘गॅलप’च्या संकेतस्थळानुसार, या संस्थेने १ ते ५ फेब्रुवारी या काळात केलेल्या या पाहणीनुसार ट्रम्प यांची लोकमान्यता घसरून ४२ टक्क्यांवर आली आहे. ट्रम्प हे प्रामाणिक आणि विश्वासार्ह नेते आहेत काय, या प्रश्नावर ६८ टक्के नागरिकांनी ‘नाही’ असे उत्तर दिले आहे. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पाठिराख्यांतील ८१ टक्के लोकांना मात्र ते प्रामाणिक आणि विश्वासार्ह वाटतात, तर १९ टक्के रिपब्लिकनांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाच्या मतदारांमध्ये हेच प्रमाण तब्बल ९१ टक्के आहे.

‘फॉक्स न्यूज’ या ट्रम्पसमर्थक वृत्तवाहिनीने गेल्या आठवडय़ात प्रसिद्ध केलेल्या पाहणीचा निष्कर्ष मात्र याहून वेगळा आहे. त्यात ट्रम्प आणि त्यांचे ‘व्हाइट हाऊस’ प्रशासन हे माध्यमांहून अधिक सत्यतावादी असल्याचे ४५ टक्के नागरिकांचे मत असल्याचे दिसून आले असून, ४२ टक्के नागरिकांना ट्रम्प यांच्याहून ‘व्हाइट हाऊस’चे वार्ताकन करणारे पत्रकार अधिक विश्वासार्ह वाटत आहेत.

दरम्यान, ट्रम्प हे सातत्याने ज्या वृत्तवाहिनीला टीका-आरोपांचे लक्ष्य करीत आहेत, त्या सीएनएन या वाहिनीचा प्रेक्षकवर्ग वाढत असल्याचे ‘फोर्बस्’ मासिकाने म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्याच कालावधीत ‘सीएनएन’च्या २५ ते ५४ या वयोगटांतील प्रेक्षकसंख्येत तब्बल ५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.