अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची आतापर्यंतची अनेक विधाने आक्रस्तळी व आक्रमक असली, तरी त्यांच्या भाषणाला दूरचित्रवाणी दर्शकांचा प्रतिसाद डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा अधिक मिळाला आहे. निल्सन कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार हिलरी क्लिंटन यांचे गुरुवारी पक्षाच्या अधिवेशनात उमेदवारी स्वीकारण्याबाबतचे भाषण २९.८ दशलक्ष प्रेक्षकांनी दूरचित्रवाणीवर पाहिले असून ट्रम्प यांचे आठवडाभरापूर्वीचे भाषण ३२.२ दशलक्ष लोकांनी पाहिले. दूरचित्रवाणी दर्शकांच्या पसंतीत आम्ही हिलरी यांना मागे टाकले आहे, असे ट्रम्प यांच्या प्रचार संयोजकांनी म्हटले आहे. कोलोरॅडो स्प्रिंग येथे ट्रम्प यांची प्रचार सभा झाली. ट्रम्प यांचे भाषण इतक्या लोकांनी पाहिले हे अविश्वसनीय आहे व दोन आठवडय़ातील कल त्यामुळे शेवटच्या रात्रीत बदलला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यक्रमात अध्यक्ष बराक ओबामा, त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा व माजी अध्यक्ष बिल क्लिंटन उपस्थित होते. त्यांच्या अधिवेशनात पहिल्या तीन दिवसांत दूरचित्रवाणी प्रेक्षकांची पसंती जास्त होती. गुरुवारी रात्रीपेक्षा अधिवेशनातील पहिल्या रात्रीच्या कार्यक्रमाला जास्त पसंती मिळाली होती. ट्रम्प यांच्या उमेदवारी स्वीकारण्याच्या भाषणाला दूरचित्रवाणी प्रेक्षकांची पसंती ९ दशलक्ष होती. रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनातील कुठल्याही दिवशी एवढी पसंती मिळाली नव्हती. ‘पीबीएस कमर्शियल’च्या मते क्लिंटन यांच्या भाषणाला ३.९१ दशलक्ष लोकांनी तर ट्रम्प यांच्या भाषणाला २.७५ दशलक्ष लोकांनी पसंती दिली. ‘फॉक्स न्यूज’ वाहिनीवर क्लिंटन यांच्या भाषणाला ट्रम्प यांच्या भाषणापेक्षा एक तृतीयांश पसंती दूरचित्रवाणी प्रेक्षकांकडून मिळाली, असे निल्सन कंपनीने म्हटले आहे. फॉक्स वाहिनीवर ट्रम्प यांचे भाषण ९.४ दशलक्ष लोकांनी पाहिले. क्लिंटन यांचे भाषण ३ दशलक्ष लोकांनी फॉक्स वाहिनीवर पाहिले.