अमेरिकी प्रसारमाध्यमांची माहिती

रशियाने गेल्या काही वर्षांत डोनाल्ड ट्रम्प यांना पद्धतशीरपणे पाठिंबा दिला व त्यांच्या व्यक्तिगत जीवनाची व आर्थिक व्यवहारांची सगळी माहिती त्या देशाने गोळा केली, असे अमेरिकेतील अनेक वृत्तपत्रांनी दिलेल्या बातम्यात म्हटले आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र हे दावे राजकीय सूडापोटी केले जात आहेत, असे सांगितले. दरम्यान रशियाने या आरोपांचा इन्कार केला असून दोन्ही देशातील संबंध बिघडवण्याच्या हेतूने या बातम्या पसरवल्या जात असल्याचे म्हटले आहे.

एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रशियाने ट्रम्प व क्लिंटन या दोघांच्याही बाबतीत त्यांना अडचणीत आणू शकेल, अशी माहिती जमवली होती पण केवळ हिलरी क्लिंटन यांना अडचणीत आणणारी माहितीच निवडकपणे प्रसारित करण्यात आली. क्लिंटन या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार होत्या. रशियाने ट्रम्प यांना निवडून येण्यास मदत केली, असे अमेरिकी गुप्तचरांनी म्हटले आहे. ट्रम्प यांचे प्रतिनिधी प्रचाराच्या वेळी रशियन सरकारला माहिती देत होते, असे एका अहवालात म्हटल्याचे वृत्त ‘सीएनएन’ने दिले आहे. ‘बझफीड’ या वृत्त संकेतस्थळाने अशी माहिती दिली आहे, की रशियाने ट्रम्प यांना कसे खतपाणी घातले व त्यांची व्यक्तिगत माहिती कशी गोळा केली, याचा गौप्यस्फोट करणारी काही कागदपत्रे अमेरिकी काँग्रेसचे प्रतिनिधी, गुप्तचर व पत्रकार यांच्यात फिरत आहेत. तो पस्तीस पानांचा अहवाल या संकेतस्थळाने जाहीर केला आहे. ट्रम्प यांचे वकील मायकेल कोहेन यांनी सांगितले, की हे आरोप चुकीचे आहेत, केवळ कल्पनाशक्तीने कुणीतरी हे सर्व तयार केले आहे. रशियाकडे ट्रम्प यांच्याबाबतही बरीच वादग्रस्त माहिती आहे असे ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे.

एफबीआय व सीआयए या अमेरिकेच्या सर्वोच्च गुप्तचर संस्थांनी रशियाने अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत हॅकिंगच्या माध्यमातून केलेल्या हस्तक्षेपाची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांना दिली. रशियाने अध्यक्षीय निवडणुकीत केलेल्या हस्तक्षेपाचा चौकशी अहवालच त्यांनी सादर केला. ट्रम्प यांनी मात्र रशियाच्या हस्तक्षेपाबाबतच्या बातम्या कपोलकल्पित असल्याचे सांगून त्याला महत्त्व देण्याचे टाळले. ‘फेक न्यूज – अ टोटल पॉलिटकल विच हंट’ असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. ट्रम्प यांची एकूणच घडण रशियाच्या माध्यमातून कशी झाली व त्यांनी सर्व माहिती कशी चोरली, अमेरिकेत कसे हस्तक्षेप केले याच्या बातम्या ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने दिल्या आहेत.