कांद्यापासून ते क्रिकेटपर्यंत ‘साहेबांची’चौफेर फटकेबाजी, नाना पाटेकर यांचा प्रांजळ संवाद आणि मकाऊमध्ये रंगलेली वेगळी ‘दुनियादारी’ यांनी यंदाच्या मराठी इंटरनॅशनल सिनेमा अँड थिएटर अ‍ॅवॉर्डस २०१३ (मिक्ता)वर आपली छाप उमटवली.
चौथ्या मिक्ता सोहळ्यादरम्यान केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री असे सगळे महत्त्वाचे पुरस्कार दुनियादारी या चित्रपटाला मिळाले.
‘साहेब आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचंय’, अशी सुरुवात करत अभिनेते सचिन खेडेकर आणि वंदना गुप्ते यांनी शरद पवार यांना बोलते केले. आपल्या राजकारणाच्या प्रवासाची सुरुवात आईच्या प्रेरणेमुळे झाली, असे सांगत पवारयांनी जुन्या काळातील आठवणी जागवल्या. पूर्वी बाजारातून घरासाठी भाजी आणायचे काम कायम माझ्याकडे असे, असे पवार यांनी सांगताच अर्थातच कांद्याचा विषय निघाला आणि कांदा सध्या गृहिणींना रडवतोय, ही खरी गोष्ट असल्याचे पवार यांनी मान्य केले. ‘पण निसर्गाच्या लहरीपणापुढे इलाज नाही असे ते म्हणाले. ‘त्याचबरोबर गेल्यासहा वर्षांत देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालाय हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. देशाला २ लाख ३२हजार कोटी रुपयांचे उत्पन्न शेतीमालाच्या निर्यातीतून मिळत आहे’, असेही त्यांनी सांगितले.
नाटकं पाडली आणि तारलीही
पुण्यात बृहनमहाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये विद्यार्थी असताना शरद पवार नाटकात कामे करायचे. त्याविषयी सांगताना ते म्हणाले, ‘आमच्या नाटकाला पुरस्कार मिळायचा. कारण इतर नाटकं पाडण्याचा ठेकाही मी घेतला होता. नाटकात काम करायचो आणि नाटके पाडायचोसुद्धा. पुढे घाशीराम कोतवाल नाटकाला विरोध झाला तेव्हा त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. या नाटकाचा संच जर्मनीला एका महोत्सवासाठी जाणार होता. त्याला शिवसेनेचा विरोध असल्याने बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला दिग्दर्शकांबरोबर गेलो. बाळासाहेबांबरोबर मत्री होती. पण हा विषय घेऊन गेलेलो त्यांना आवडले नाही. ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि ‘घाशीराम’च्या कलाकारांची गाडी पुण्यातून मुंबईला येताना सेनेची मुले खोपोलीजवळच अडवणार असेही सांगितले. मग मी शंतनुराव किर्लोस्कर, कल्याणी आदी उद्योजकांच्या मदतीने त्यांची खासगी विमाने घेतली आणि घाशीरामच्या संचाला थेट विमानाने मुंबई विमानतळापर्यंत सुखरूप पोचवले. पुढे जर्मनीमध्ये घाशीरामला स्टॅंिडग ओव्हेशन मिळाले’.
सुनील गावस्कर यांचे आजोबा बाप्पा गावस्कर यांच्या खवचट कोकणी बोलण्याची वेंगुल्र्याची आठवण त्यांनी सांगितली आणि कोकण हा आवडता प्रांत असल्याचेही नमूद केले. कोकणात लोकांशी ‘सुसंवाद’ साधायला आवडतो, असे ते म्हणाले.
‘हवा का एक छोटासा झरा बन जाऊँ’
आपण सन्मानामध्ये अडकतो. ते योग्य नाही. समारंभाचे अधिष्ठान माणसांच्या भेटी हे असले पाहिजे, असे मनोगत नाना पाटेकर यांनी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केले. मी फक्त क्रांतीवीर केला असे नाही, असे सांगत नाना यांनी प्रकाश आमटे यांच्यावरील चित्रपटाविषयी सांगितले आणि त्यातील एक कविता ‘हवा का एक छोटासा झरा बन जाऊँ म’ ही कविता ऐकवून रसिकांची मने जिंकून घेतली.
पुरस्कार सोहळा भारतात व्हावा – पवार
महाराष्ट्राबाहेर भारतातही अनेक मराठी लोक आहेत. मिक्तासारखा सोहळा देशातच झाला, तर पन्नास हजार लोक उपस्थित राहू शकतील. तो एक वर्ष भारतात आणि एक वर्ष परदेशात घ्यावा, अशी सूचना शरद पवार यांनी केली. चित्रपट- नाट्य सृष्टीची सद्यस्थिती बदण्यासाठी हा सोहळा भारतात घेणे अधिक श्रेयस्कर ठरेल. दिल्ली, इंदौर, बंगळूरू अशा ठिकाणी बरेच मराठीजन आहेत. त्यांच्यापर्यंत पोचायला हवे, असेही ते म्हणाले.
पुरस्कारांची यादी चित्रपट विभाग
सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार – दुनियादारी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – संजय जाधव दुनियादारी
सर्वोत्कृष्ट अभिनेता (विभागून) – अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी (दुनियादारी) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – सई ताम्हणकर (दुनियादारी), सहाय्यक अभिनेता – हृषिकेश जोशी (आजचा दिवस माझा), सहाय्यक अभिनेत्री – सई (अनुमती)
नाट्य विभाग
सर्वोत्कृष्ट नाटक – प्रपोजल
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – राजन ताम्हाणे, प्रपोजल, अभिनेता – आस्ताद काळे (प्रपोजल) आणि स्वप्नील जोशी (गेट वेल सून) अभिनेत्री – आदिती सारंगधर (प्रपोजल) राधिका इंगळे (डू अँड मी) देवेंद्र सरळकर (डू अँड मी)