पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ‘मन की बात’  कार्यक्रमामधून देशवासियांशी संवाद साधताना दुष्काळ आणि शिक्षण या विषयांवर भाष्य केले.  पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल असून त्याला वाचवा असे आवाहनही पंतप्रधानांनी आज केले.
नरेंद्र मोदी म्हणाले, पावसाचे पाणी वाचवून सुद्धा दुष्काळाच्या संकटावर मात करता येऊ शकते. यासाठी सर्वांनी पावसाचे पाणी साठवण्यासाठी आपल्या घरांच्या खाली टाक्या तयार करायला हव्यात. यामुळे पडणारे पाणी या टाक्यांत साठवले जाऊन पाण्याची बचत होईल. गावांमध्ये पाण्याचे संवर्धन आणि साठवण करणे आवश्यक आहे. आपण यासाठी अभियान सुरु केले पाहिजे. पाण्याची पातळी वाढल्यानंतर पाण्याचा दर्जाही सुधारेल आणि स्वच्छ पाणी म्हणजे उत्तम आरोग्य आणि आर्थिक विकास असल्याचे मोदींनी सांगितले. तसेच सरकारच्या अनेक योजना यशस्वी होत असल्याचे ते म्हणाले. देशातील जनतेने उस्फूर्तपणे गॅस सबसिडी सोडल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. आतापर्यंत १ कोटी लोकांनी गॅस सबसिडी सोडल्याचे त्यांनी म्हटले.