शतकातील सर्वात महत्त्वाचा शोध; द्वैती कृष्णविवरांचे अस्तित्वही सिद्ध
गेले शतकभर विज्ञानाला हुलकावणी देणाऱ्या आणि विश्वाच्या जडणघडणीसंबंधी मानवी आकलनात महत्त्वाची भर घालू शकणाऱ्या गुरुत्व तरंगांच्या (ग्रॅव्हिटेशनल वेव्हज्) अस्तित्वाचा पुरावा सापडल्याचे गुरुवारी शास्त्रज्ञांनी जाहीर केले. ‘हिग्ज बोसन’ (देवकण)च्या पाठोपाठ गेल्या शतकातील हा सर्वात महत्त्वाचा शोध आहे. प्रख्यात शास्त्रज्ञ आइनस्टाइन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतावर तसेच द्वैती कृष्णविवरांच्या अस्तित्वावर ‘लिगो’ प्रयोगशाळांच्या या संशोधनाने शिक्कामोर्तब झाले.
अल्बर्ट आइनस्टाइन यांनी १९१६ साली मांडलेल्या व्यापक सापेक्षतावादाच्या सिद्धांतामध्ये (जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी) गुरुत्व तरंगांच्या अस्तित्वाचा दावा केला होता. मात्र आजतागायत वैज्ञानिक जगताला त्यांचे अस्तित्व पुराव्यानिशी सिद्ध करता आले नव्हते. ही कोंडी फुटली असून विश्वाच्या जडणघडणीबाबत माहिती मिळवण्याची नवी दिशा खुली झाल्याचे शास्त्रज्ञांनी जाहीर केले आहे.
गुरुत्वतरंग शोधातील शास्त्रज्ञांच्या गटाने गुरुवारी वॉशिंग्टन डीसी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली. ‘लिगो’चे व्यवस्थापकीय संचालक आणि कॅलटेकचे शास्त्रज्ञ डेव्हिड रिट्झ यांनी अत्यानंदाने घोषणा केली, ‘वुई डिड इट! हा शोध खरा ठरणार अशी आतापर्यंत लावली जाणारी अटकळ खरी ठरली आहे.’ रिट्झ म्हणाले की, १.३ अब्ज वर्षांपूर्वी दोन कृष्णविवरे एकमेकांवर आदळून विलीन झाली होती. त्यातून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरी उघड झाल्या.
‘लिगो’ प्रकल्पांतर्गत अमेरिकेतील लुईझियाना राज्यातील लिव्हिंगस्टन आणि वॉशिंग्टनमधील हॅनफर्ड येथे दोन प्रयोग शाळांची रचना करण्यात आली होती. तसेच इटलीतही अशाच प्रकारची यंत्रणा निर्माण करण्यात आली होती. जमिनीखालील काही किलोमीटर लांबीच्या विवरांमध्ये दोन्ही बाजूला आरसे लावून त्यावरून लेझर किरणांचे झोत परावर्तित केले गेले. ही विवरे बाह्य़ गोंगाटापासून मुक्त ठेवली होती. त्यामुळे परावर्तित होणाऱ्या प्रकाशझोतांमध्ये गुरुत्वतरंगांमुळे होणाऱ्या सूक्ष्म बदलांचीही नोंद घेता आली. त्यावरून गुरुत्वतरंगांचे अस्तित्व सिद्ध करण्यात आले.
भारतीयांचाही वाटा..
भारतीय शास्त्रज्ञांचाही यात मोठा वाटा होता. आपल्या देशातील संशोधकांचे नेतृत्व ‘आयुका’चे सुकांत बोस यांनी केले. दोन कृष्णविवरांचा आघात होऊन ते एकमेकात विलीन होऊन एकच कृष्णविवर तयार होते व त्या वेळी गुरुत्वीय लहरी बाहेर पडतात, असे भाकित भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. विश्वेश्वरय्या यांनी केले
होते; ते खरे ठरले आहे.
पुण्यात या शोधाचा आनंद द्विगुणीत करताना विश्वेश्वरय्या यांच्यासह अणुआयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर, आयुकाचे संस्थापक डॉ. जयंत नारळीकर, माजी संचालक अजित केंभावी, संचालक सोमक रायचौधुरी उपस्थित होते.
गुरुत्वीय लहरी..
कुठलाही पदार्थ विश्वातून पुढे जातो तेव्हा गुरुत्वीय लहरी तयार होत असतात. जेव्हा एखादा पदार्थ पाण्यातून पुढे जातो तेव्हा लहरी निर्माण होतात तशाच प्रकारे येथे गुरुत्व लहरी निर्माण होतात. गुरुत्वीय लहरी या कमी शक्तिशाली असतात व त्यांचे अस्तित्व ओळखणे किंवा मापन करणे शक्य झाले नव्हते ते आता साध्य झाले आहे.

Untitled-11

या शोधाचे महत्त्व..
* आइस्टाइनच्या सापेक्षतावाद सिद्धांताला पुष्टी.
* कृष्णविवरे आणि न्यूट्रॉन ताऱ्यांच्या टकरींमुळे गुरुत्वतरंगांची निर्मिती होते असे मानले जाते. त्यामुळे आता कृष्णविवरे आणि न्यूट्रॉन ताऱ्यांच्या अस्तित्वालाही पुष्टी.
* आपल्याला विश्वासंबंधी जी काही माहिती मिळाली आहे ती रेडिओ लहरी, गॅमा किरण, क्ष-किरण अशा प्रकारच्या विद्युतचुंबकीय लहरींच्या माध्यमातून मिळाली आहे. विद्युतचुंबकीय लहरी विश्वात विखुरत जातात. त्यामुळे त्यांच्या आधारे होणाऱ्या संशोधनावर मर्यादा येतात. मात्र त्याच्या पलीकडे विश्वाच्या पसाऱ्यात अनेक रहस्ये लपलेली आहेत. ती शोधण्यासाठी गुरुत्वतरंगांची मदत मिळणार आहे.
* विश्वाच्या उत्पत्तीनंतरच्या स्थितीचाही शोध घेता येईल.