भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने दिलेल्या दणक्यामुळे भारतातील वादग्रस्त ‘फ्री बेसिक्स’ योजना बंद करावी लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ‘फेसबुक’च्या भारतातील प्रमुख किर्तिगा रेड्डी यांनी आपण कंपनीच्या अमेरिकेतील मुख्यालयात परत जात असल्याचे सांगितले आहे. इमर्जिग मार्केट्सचे व्यवस्थापकीय संचालक विल्यम ईस्टन आणि आशिया पॅसिफिक क्षेत्राचे उपाध्यक्ष डॅन नीअरी यांच्यासह आपण भारतातील आपल्या वारसदाराचा शोध घेत आहोत, असे रेड्डी म्हणाल्या. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ऑपरेटर्सना इंटरनेट सेवांसाठी वेगवेगळे दर आकारण्यास बंदी घातल्यानंतर फेसबुकने गुरुवारी त्यांचे भारतातील ‘फ्री बेसिक्स’ बंद केले होते. भारतात रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या भागीदारीत ही योजना देऊ करण्यात आली होती व पूर्वी ती इंटरनेट डॉट ओआरजी या नावाने ओळखली जात होती. माझे वडील भारतात परतले, तेव्हाच आम्ही कधीतरी अमेरिकेला परत जाऊ याची आम्हाला कल्पना होती, असे फेसबुक इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक असलेल्या रेड्डी यांनी एका पोस्टमध्ये लिहिले.