ज्येष्ठ काँग्रेस नेत्या व माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांच्या आरोपांनंतर पक्ष उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या बचावासाठी केंद्रीय नेते मैदानात उतरले आहेत. उद्योग जगताचे भले करण्यासाठी राहुल गांधी यांनी आपल्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रिपदावरून दूर केल्याचा गौप्यस्फोट करीत नटराजन यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. राहुल यांचा बचाव करताना पक्ष प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, नटराजन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. त्यात कितपत तथ्य होते हा एक वेगळा विषय आहे. पण आरोप झाल्यानेच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली होती.
नटराजन या संधिसाधू असून पक्षनेतृत्वावर खोटेनाटे आरोप करीत असल्याचा पलटवार पक्ष प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर असा कोणता दबाव आला की नटराजन यांनी आत्ताच तोंड उघडले? नटराजन एकदाही लोकसभा निवडणूक लढल्या नाहीत. तरी त्यांना काँग्रेसने सलग चारदा राज्यसभा सदस्यत्व देऊन केंद्रात मंत्री केले. त्यांच्यावर ‘जयंती टॅक्स’ वसूल करतात अशी टीका झाली. त्याचे उत्तर त्यांनी एकदाही दिले नाही असा आरोप त्यांनी केला.सरकारकडून चौकशी
पर्यावरणमंत्री असताना घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची चौकशी करण्याची मागणी नटराजन यांनी केली. त्यास केंर्दीय अर्थमंत्री अरुण जेटली व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी अनुकूलता दर्शवली आहे. नटराजन यांनी राहुल गांधी यांच्यावर जो आरोप केला त्यामुळे यूपीए सरकार भांडवलशाहीधार्जिणे असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे आता ज्या मंजुऱ्या देण्यात अथवा नाकारण्यात आल्या त्या प्रत्येक प्रकरणाची पर्यावरण मंत्रालय चौकशी करून कायद्यानुसार त्यांचा सोक्षमोक्ष लावेल, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.