मेक इन इंडिया ही केवळ एक घोषणा नसून, ती प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याची जाणीव करून देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी एफडीआय या संकल्पनेची वेगळी बाजू उद्योगपतींसमोर मांडली. एफडीआय म्हणजे केवळ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नसून, प्रत्येक भारतीयासाठी फर्स्ट डेव्हलप इंडिया ही जबाबदारी असल्याचे मोदी यांनी सांगितले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणामध्ये मोदी यांनी मेक इन इंडियाचा नारा दिला होता. या संकल्पनेचा औपचारिक शुभारंभ गुरुवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमात झाला. मोदी यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचबरोबर देशातील वेगवेगळ्या ठिकाणीहून आलेले अनेक उद्योगपती कार्यक्रमाला उपस्थित होते.
मोदी म्हणाले, एफडीआयकडे केवळ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितले नाही पाहिजे. एफडीआय ही प्रत्येक भारतीयाचीच जबाबदारी आहे. प्रत्येकानेच त्याचा फर्स्ट डेव्हलप इंडिया असाही अर्थ घेतला पाहिजे. भारताकडे केवळ बाजार म्हणून बघितले नाही पाहिजे. त्यापेक्षा येथील ग्राहकांची क्रयशक्ती कशी वाढेल, याचाही विचार केला पाहिजे. त्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. रोजगार वाढला तर सामान्य ग्राहकांची क्रयशक्ती वाढेल आणि तो अधिक दर्जेदार वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कोणताही गुंतवणूकदार गुंतवणूक करताना पहिल्यांदा सुरक्षिततेचा विचार करतो आणि त्यानंतर फायद्याचा विचार करतो, असे सांगून ते म्हणाले, कार्यक्षम प्रशासनाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली जाऊ शकते. गेल्या तीन महिन्यांच्या माझ्या अनुभवावरून असे दिसते की प्रशासकीय यंत्रणा खूप सकारात्मकपणे काम करीत असून, ते सगळे माझ्यापेक्षाही दोन पावले पुढे आहेत. लोकशाही, भौगोलिक रचना आणि बाजार या तीन गोष्टींमुळे परदेशी गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित होतो, असेही त्यांनी सांगितले.
भारताचे मंगळयान पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहोचल्यामुळे आपल्याकडे बुद्धिमान मनुष्यबळ आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जगातील नागरिकांना याबद्दल आपण विश्वास मिळवून दिला पाहिजे. पंतप्रधान जन-धन योजनेला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाल्याचा उल्लेख करून या योजनेच्या माध्यमातून १५०० कोटी रुपये बॅंकेकडे जमा झाल्याचे त्यांनी सांगितले.