बिहारच्या राजकीय पटलावर वेगाने घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी  गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मोदी आणि मांझी यांच्यात बिहारच्या राजकीय समीकरणाबद्दल चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रिमो लालूप्रसाद यादव यांनी मांझींना पक्षात येण्याचे खुले आवाहन केले होते. या ऑफरवर मांझी म्हणाले, ‘लालू यादवांनी नितीशकुमारांसोबतची आघाडी तोडली तरच मी त्यांच्यासोबत जाईन. मला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केल्यानतंरच लालूंसोबत आघाडी होऊ शकते.’ काही महिन्यांपूर्वीच मांझींना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यासोबतच नितीशकुमारांमुळे त्यांची जनता दल (संयुक्त) पक्षातूनही (जेडीयू) हकालपट्टी करण्यात आली आहे. आगामी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात बिहारमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे तिथे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
मांझी एवढे महत्त्वाचे कसे ?
जातीय समीकरणामुळे बिहारचे माजी मुख्यमंत्री महादलित नेते जीतनराम मांझी यांच्यासाठी सर्वच पक्ष गळ टाकत आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जेडीयूला २५ टक्के महादलित समाजाचे मतदान झाले होते. यात मांझी यांचा वाटाही महत्त्वाचा होता. मांझी मुसहर जातीचे आहेत. या समाजाचे गया, जहानाबादसह बिहारमधील ३० जागांवर निर्णायक मतदान आहे. याशिवाय शाहाबाद, चम्पारण येथील डझनभर जागांवरही या समाजाचा प्रभाव आहे. मांझी भाजपसोबत गेले किंवा स्वतंत्र लढले तरी दोन्ही बाजूंनी फायदा भाजपचाच आहेत.