बिहार निवडणुकीच्यावेळी ओवेसी बंधू आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यात गुप्त डील झाल्याचा गौप्यस्फोट माजी भाजप आमदाराकडून करण्यात आला आहे. गुजरातचे माजी भाजप आमदार यतिन ओझा यांनी अरविंद केजरीवालांना लिहलेल्या पत्रातून ही बाब उघड झाली आहे. ओझा यांच्या दाव्यानुसार अमित शहा यांनी अकबरूद्दीन ओवेसी यांची भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये गुप्त युतीचा करार झाला होता. अमित शहांच्या घरी ही भेट झाल्याचे ओझा यांनी म्हटले आहे. ‘जनता का रिपोर्टर’ ने याबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्तात ओझा यांनी आम आदमी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ते येत्या गुरूवारी ‘आप’मध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. ओझा यांनी पत्रात अमित शहा आणि ओवेसी यांच्यात झालेल्या कराराबद्दल सांगितले आहे. या करारानुसार बिहारमध्ये मुस्लिमबहुल भागात एमआयएमने उमेदवार उभे करण्याचे ठरले होते. याशिवाय, ओवेसी विखारी भाषणे करतील, असेही या करारामध्ये ठरले होते. या भाषणांची स्क्रिप्ट अमित शहा यांनी लिहली होती. या माध्यमातून जातीय फूट पाडण्याचा प्रयत्न होता, असे ओझा यांनी पत्रात म्हटले आहे. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेस हे तीन पक्ष भाजपविरुद्ध एकत्र आले होते. तर भाजपनेही जीतन राम मांझी यांच्यासह अनेक स्थानिक पक्षांशी युती केली होती.
oza1 oza2