क्रांतीकारक भगतसिंग यांचे पिस्तुल प्रदर्शनासाठी ठेवण्याची तयारी सीमा सुरक्षा दलाकडून सुरु आहे. त्यामुळे स्वातंत्र्यसेनानी भगतसिंह यांनी ज्या पिस्तुलाने १९२८ मध्ये ब्रिटिश अधिकारी जॉन सँडर्स यांचा खून केला, ते पिस्तुल सर्वसामान्यांना पाहता येणार आहे. सीमा सुरक्षा दलाकडून भगतसिंग यांचे पिस्तुल नव्या शस्त्रास्त्र संग्रहालयात ठेवले जाणार आहे. सध्या भगतसिंग यांचे .३२ बोर कोल्ट पिस्तुल इंदूरच्या सेंट्रल स्कूल ऑफ वेपन्समध्ये ठेवण्यात आले आहे.

‘ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सँडर्सचा खून करताना भगतसिंग यांनी वापरलेले पिस्तुल सध्या सीएसडब्ल्यूटीच्या जुन्या संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. या पिस्तुलाला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळेच भगतसिंग यांनी वापरलेले हे पिस्तुल नव्या संग्रहालयात ठेवण्यात येईल. येत्या दोन महिन्यांमध्ये नव्या शस्त्र संग्रहालयाचे काम पूर्ण होईल,’ अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक पंकज गूमर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. भगतसिंग यांच्या पिस्तुलासोबत त्यांच्या जीवनाची माहितीदेखील नव्या संग्रहालयात देण्यात येईल.

‘भगतसिंग यांचे पिस्तुल ७ ऑक्टोबर १९६९ रोजी सीएसडब्ल्यूटीमध्ये आणण्यात आले. या पिस्तुलासहित सात इतर शस्त्रेदेखील सीएसडब्ल्यूटीमध्ये आणण्यात आली. पंजाबमधील फिल्लोर येथील पोलीस अकादमीतून भगतसिंग यांचे पिस्तुल सीएसडब्ल्यूटीमध्ये आणण्यात आले होते. हे पिस्तुल ब्रिटिश काळात लाहोरमधून पोलीस अकादमीत आणले असावे,’ अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक पंकज गूमर यांनी दिली आहे.

भगतसिंगांनी अखेरची गोळी झाडलेले ‘ते’ पिस्तुल ९० वर्षांनी जगासमोर

‘भगतसिंग आणि त्यांच्या आयुष्याचा अभ्यास करणाऱ्या गटाला ऐतिहासिक पिस्तुलाबद्दची माहिती देण्यात आली आहे. ऐतिहासिक दस्ताऐवजानुसार संग्रहालयात ठेवण्यात आलेले पिस्तुल भगतसिंग यांचेच असल्याचे आणि ते त्यांच्याजवळ असतानाच ताब्यात घेण्यात आल्याची माहिती उपलब्ध आहे. यासोबतच याच पिस्तुलाच्या मदतीने भगतसिंग यांनी ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सँडर्सचा अचूक वेध घेतला होता,’ अशी माहितीही पंकज गूमर यांनी दिली आहे.

भगतसिंग यांनी लाहोरमध्ये १७ डिसेंबर १९२८ रोजी सँडर्सला टिपले होते. या घटनेचा उल्लेख लाहोर कट असा केला जातो. भगतसिंग यांना त्यांचे सहकारी राजगुरु आणि सुखदेव यांच्यासह २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली.