आणीबाणीनंतर प्रस्थापित राजकीय पक्षांविरोधात एकवटलेल्या जनता पक्षाच्या कारकीर्दीची पुनरावृत्ती सध्या आम आदमी पक्षात सुरू आहे. आम आदमी पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न विचारल्यावर आम्ही जणू काही अरविंद केजरीवाल यांना विरोध करीत असल्याचा अपप्रचार पक्षाच्याच नेत्यांनी सुरू केल्याची तोफ प्रा. योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांनी डागली. पक्षात लोकशाही नाही. अरविंद केजरीवाल हुकूमशहासारखे वागतात, अशा शब्दांत प्रशांत भूषण यांनी दिल्लीत ऐतिहासिक बहुमताच्या जोरावर सत्तेत आलेल्या आम आदमी पक्षाच्या कारभाराची लक्तरे काढली. चुकीच्या मार्गाने सत्ता मिळवण्यास आमचा विरोध होता. त्यास व्यक्तिविरोधाचा रंग देण्यात आला. पक्षाच्या कार्यपद्धतीविषयी आम्हाला आक्षेप आहेत, असे स्पष्टीकरण योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांनी दिले. उद्या, शनिवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. त्यापूर्वीच थेट केजरीवाल यांच्याविरोधात उभय नेत्यांनी दंड थोपटल्याने खळबळ माजली आहे. एकाच कुटुंबातील दोघांना पद देण्यास पक्षाचा विरोध आहे; पण एकाच व्यक्तीने दोन लाभांची पदे न स्वीकारण्याची तरतूद पक्षाच्या घटनेत नाही, अशी सूचक माहिती देत यादव यांनी मुख्यमंत्री बनल्यानंतरही पक्षाची सूत्रे ताब्यात ठेवणाऱ्या केजरीवाल यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांनी पक्षाच्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या राजकीय व्यवहार समितीतून (पीएसी) बहुमताने यापूर्वीच डच्चू देण्यात आला आहे. तेव्हापासून हे दोन्ही नेते स्वतंत्र पक्ष काढण्याची चर्चा सुरू आहे. दोन्ही नेत्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त पसरले होते. या चर्चावर स्पष्टीकरण यादव यांनी दिले. ते म्हणाले की, आम्ही अद्याप राजीनामा दिलेला नाही. जे म्हणतात आम्ही राजीनामा दिला; त्यांनी त्याची प्रत सादर करावी. आमच्या पाच प्रश्नांना उत्तरे द्यावीत. त्यानंतर आम्ही राजीनामा देऊ, अशी भूमिका यादव यांनी घेतली.

..म्हणून केजरीवाल नाराज
*‘आप’ला माहिती अधिकार कायद्याच्या क्षेत्रात आणणे
* बनावट चेक निधीस्वरूपात स्वीकारल्याची चौकशी करणे
* राष्ट्रपती राजवटीदरम्यान काँग्रेसमध्ये फूट पाडून सत्तास्थापनेसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती देणे
* दिल्लीच्या कायदा मंत्र्यांविरोधातील बनावट प्रमाणपत्र सादर केल्याच्या आरोपांची चौकशी करणे
* विधानसभा निवडणुकीच्या काळात आप उमेदवाराच्या घरी दारूचा साठा पकडण्यात आला होता. त्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी.