दिल्ली-मुंबई महामार्गावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोलची वसुली (इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन, ‘ईटीसी’) करण्याच्या यंत्रणेचे उद्घाटन आज, शुक्रवारी होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी ही नवीन यंत्रणा कार्यान्वित करणार आहेत.
दिल्ली ते मुंबईदरम्यानचा महामार्ग हरयाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांतून जात असून त्यावरील ५५ टोलवसुली केंद्रांवर या यंत्रणेचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. त्यामध्येही मुंबईजवळ चारोटीपासून ते अहमदाबादपर्यंतच्या १० केंद्रांवर या यंत्रणेची चाचणी यशस्वीरीत्या घेण्यात आली. यापुढे सर्व महामार्गाच्या प्रकल्पांचे काम संबंधितांना देताना त्यावर इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने टोलवसुली करण्यासाठी संबंधित मार्गिका तयार करणे सक्तीचे करण्यात आले आहे. देशभरात ‘ईटीसी’ पद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी कंपनी कायद्यानुसार एक कंपनीही स्थापन करण्यात आली आहे.