‘एअर बॅग्स’मध्ये समस्या; ५५० दशलक्ष डॉलरचा खर्च अपेक्षित

अमेरिकन नियामकानुसार एअर बॅग्सच्या इन्फ्लेटर्समध्ये दोष असल्याने अमेरिकेतील प्रसिद्ध वाहन निर्माण कंपनी जनरल मोटर्सने आणखी ४.३ दशलक्ष वाहने परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. वाहने परत बोलावण्यामुळे कंपनीला तब्बल ५५० दशलक्ष डॉलरचा खर्च येणार आहे.

वाहनांमधील एअर बॅग्समध्ये असणारे इन्फ्लेटर्स योग्य काम करीत नसल्याने मे महिन्यामध्ये १.९ दशलक्ष वाहने परत बोलावण्यात आली होती. जून महिन्यामध्ये आणखी ६ लाख वाहने परत बोलावण्यात आली होती, असे जनरल मोटर्सने माहिती देताना सांगितले.

एअर बॅग्स सुरक्षित करण्यासाठी ४.३ दशलक्ष वाहनांसाठी अतिरिक्त ५५० दशलक्ष डॉलरचा खर्च अपेक्षित आहे, तर २.५ दशलक्ष वाहनांमधील इन्फ्लेटर्स बदलण्यासाठी ३२० दशलक्ष डॉलरचा खर्च आला आहे.

जगभरातील १०० दशलक्ष वाहनांच्या एअर बॅग्समध्ये दोष आढळून आला असून, यामुळे आतापर्यंत १३ जण अपघातामध्ये ठार झाले असून, १०० जण जखमी झाले आहेत. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी कंपनी कटिबद्ध असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने या वेळी सांगितले.

जनरल मोटर्सने देशातील एक अब्ज डॉलरची गुंतवणूक थांबवली

अमेरिकेतील प्रमुख वाहन कंपनी जनरल मोटर्सने देशात १ अब्ज डॉलरची गुंतवणूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांचा प्राधान्यक्रम बदलत असल्याने आणि नियामकाची अनिश्चितता तसेच मोठे आर्थिक नुकसान यामुळे कंपनीने भारतासाठी तयार होणाऱ्या भविष्यातील उत्पादनांचा आढावा घेतला आहे. कंपनी भारताच्या बाजारावर लक्ष ठेवत असून, त्याप्रमाणे उत्पादन धोरणांमध्ये बदल करण्यात येत असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने माहिती देताना सांगितले.