चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बाळगणाऱ्यांकडून आता दंड आकारला जाणार आहे. पाचशे आणि हजाराच्या १० पेक्षा जास्त नोटा बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचा कायदा केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार दोषींवर किमान १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

संसदेने मागील महिन्यात निर्दिष्ट बँक नोट (उत्तरदायित्व समाप्ती) कायदा मंजूर केला आहे. रद्द करण्यात आलेल्या नोटांच्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था चालवली जाऊ नये, यासाठी संसदेने हा कायदा पारित केला आहे. पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांच्या सहाय्याने समांतर अर्थव्यवस्था उभी राहू नये, यासाठी सरकारने हा कायदा लागू केला आहे. या कायद्यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २७ फेब्रुवारी रोजी स्वाक्षरी केली आहे.

नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर दरम्यानचा कालावधी देण्यात आला होता. या काळात परदेशात असणाऱ्या भारतीयांना नोटा बदलण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र तरीही अशा नागरिकांकडे पाचशे किंवा हजाराच्या दहापेक्षा अधिक नोटा सापडल्यास त्या व्यक्तीला ५० हजारांचा दंड भरावा लागणार आहे.

निर्दिष्ट बँक नोट कायद्यामुळे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा नागरिकांना स्वत: जवळ बाळगता येणार नाहीत. निर्दिष्ट बँक नोट कायदा लागू झाल्यामुळे देशातील नागरिकांना पाचशे आणि हजाराच्या १० पेक्षा अधिक जुन्या नोटा बाळगता येणार नाहीत. तर संशोधन करणाऱ्या व्यक्तीला स्वत: जवळ पाचशे आणि हजाराच्या २५ पेक्षा अधिक जुन्या नोटा ठेवता येणार नाहीत. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तीकडून दंड आकारला जाईल. १० हजार रुपये किंवा जितक्या किमतीच्या जुन्या नोटा मिळतात, त्या किमतीच्या पाच पट रक्कम, या दोनपैकी जी रक्कम अधिक असेल, तितका दंड आकारण्यात येणार आहे. या कायद्यामुळे जुन्या नोटांबद्दलची रिझर्व्ह बँकेची जबाबदारी संपुष्टात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. पंतप्रधान मोदींच्या या निर्णयामुळे पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या. काळा पैसा, बनावट नोटा, दहशतवाद्यांना होणारी आर्थिक मदत, भ्रष्टाचार रोखण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेत असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते.