‘नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता नसबंदी करण्याची गरज आहे. देशाची लोकसंख्यावाढ रोखण्यासाठी नसबंदी आवश्यक आहे,’ असे वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केले आहे. ‘देशाच्या विकासासाठी आणि सलोखा टिकवण्यासाठी लोकसंख्या वाढीवर मर्यादा असायला हवी. त्यासाठी नसबंदी गरजेची आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईदेखील व्हायला हवी,’ असेही गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे.

गिरीराज सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना केंद्र सरकार ‘नोटाबंदीच्या निर्णयानंतर नसबंदीचा निर्णय घेणार का ?,’ असा प्रश्न विचारण्यात आला. ‘देशाची विकासासाठी आणि सामाजिक समरसतेसाठी लोकसंख्येवर नियंत्रण असायला हवे. यासाठी कायद्याची आवश्यकता आहे. जगातील १७ टक्के लोकसंख्या भारतात राहते. मात्र आपली जमीन जगाच्या जमिनीच्या तुलनेत फक्त २.५% आहे. याशिवाय जगाच्या एकूण पाण्याच्या संसाधनांपैकी ४.१%च पाणी आपल्या देशात आहे,’ असे गिरीराज सिंह यांनी म्हटले.

गिरीराज सिंह यांनी नुकतीत ओडिशाला भेट दिली. यावेळी लोकसंख्या नियंत्रणासाठी ओडिशा सरकारने राबवलेल्या योजनांचे कौतुक केले. ‘गरिब हिंदूंनी याचा स्वीकार केला आहे. जे या कायद्याचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कछोर कारवाई व्हायला हवी,’ असेही गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे.

गिरीराज सिंह एप्रिलमध्येही त्यांच्या वक्तव्यामुळे वादग्रस्त ठरले होते. ‘दोन अपत्यांचा कायदा पाळला न गेल्यास हिंदूंच्या मुली सुरक्षित राहणार नाहीत,’ असे विधान गिरीराज सिंह यांनी केले होते. लोकसंख्या नियंत्रण कायद्याची मागणी करताना फक्त हिंदूंनाच दोन अपत्ये का असावीत ? मुस्लिमांनीही फक्त दोन अपत्ये असावीत,’ असे गिरीराज यांनी म्हटले होते.

याआधी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही गिरीराज यांनी वादग्रस्त विधान केले होते. ‘भाजपला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानमध्ये जावे,’ असे विधान गिरीराज यांनी केले होते.