शौर्य दाखवण्याची हौस असेल तर सीमेवर जाऊन लढा अशा शब्दात अहमदाबाद हायकोर्टाने पत्नीचा छळ करणा-या पतीला सुनावले आहे. जर घरातच एखाद्याला शांतता मिळत नसेल तर त्याचे जगणेच कठीण होईल असे मतही हायकोर्टाने मांडले आहे.
गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यात राहणारे वनराजसिंह राणा हा व्यवसायाने चालक असून त्याची पत्नी सूर्याबेन या गृहिणी आहेत. राणा दाम्पत्याला तीन मुल आहेत. मात्र वनराजसिंह सूर्याबेन यांचा छळ करत होता. त्याने पत्नीला तलवार दाखवत ठार मारण्याची धमकी दिली होती. पतीचा छळ असह्य झाल्याने सूर्याबेन यांनी काही महिन्यांपूर्वी पतीविरोधात गांधीनगर जिल्ह्यातील चिलोदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पत्नीचा छळ करणे, ठार मारण्याची धमकी देणे, मारहाण करणे अशा विविध कलमांखाली वनराजसिंहविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सूर्याबेन यांनी तक्रार दाखल झाल्यावर काही दिवसांनी पती – पत्नीमध्ये समेट झाला. राजपूत समाजातील पंच आणि घरातील ज्येष्ठ मंडळींनी दोघांमध्ये समेट घडवला होता. गुन्हा रद्द व्हावा यासाठी वनराजसिंहने अहमदाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तक्रारकर्त्यांचे सध्या काही म्हणणे नसून यापुढे पत्नीला त्रास देणार नाही असे वनराजसिंह यांनी कोर्टातील याचिकेत म्हटले होते. या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने राणा दाम्पत्याला समन्स बजावले होते. सुनावणी दरम्यान हायकोर्टाच्या न्यायाधीश सोनिया गोकाणी यांनी वनराजसिंहला कठोर शब्दात सुनावतानाच पत्नीला पुन्हा त्रास देऊ नका अशी तंबीच दिली. गोकाणी म्हणाल्या, तुम्हाला जम्मू काश्मीरमधील सध्यस्थिती माहिती आहे. तिथे सीमारेषेवर लोकांची गरज आहे. तुम्हाला तलवार काढून स्वतःचे शौर्य  आणि ताकद दाखवायची असेल तर तुम्ही सीमारेषेवरच गेले पाहिजे असे हायकोर्टाने सुनावले.
घरात शांतता आणि सहकार्याचे वातावरण गरजेचे असते. पण जर एखाद्याला घरात शांती मिळत नसेल तर त्याचे जगणे कठीण आहे असे मत हायकोर्टाने मांडले. सूर्याबेन यांनीदेखील पतीविरोधातील तक्रार रद्द करण्याची इच्छा व्यक्त केल्यावर हायकोर्टाने वनराजसिंहविरोधातील गुन्हा रद्द केला. तसेच पोलिसांच्या सामाजिक कल्याण विभागाच्या एका अधिका-याला पुढील दोन वर्ष सातत्याने दाम्पत्याच्या घरी जाऊन पाहणी करण्याच आदेश दिले. पती सूर्याबेन यांना त्रास तर देत नाही ना याची खातरजमा करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले. जर पाहणीदरम्यान वनराजसिंहने पुन्हा पत्नीला त्रास दिल्याचे समोर आले तर त्याच्याविरोधात पुन्हा गुन्हा दाखल केला जाईल असे हायकोर्टाने स्पष्ट केले.