मोटारमनशिवाय मालगाडी सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत गेली. त्यामुळे दौसा जिल्ह्य़ातील उत्तर पश्चिम रेल्वेच्या सहाय्यक स्थानकमास्तर आणि गाडीच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. भांकरी स्थानकात ही मालगाडी उभी होती. या वेळी मालगाडीवर मोटारमन अथवा गार्ड उपस्थित नव्हता. तरीही ती स्थानकापासून सुमारे एक किलोमीटपर्यंत गेल्याची माहिती रेल्वे अधिकारी तरुण जैन यांनी सोमवारी दिली. याप्रकरणी एक चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने हलगर्जीपणाबद्दल सहाय्यक स्थानकमास्तर के. पी. मीना, मोटारमन ब्रिजबिहारी आणि गार्ड रमेशचंद, तसेच सहाय्यक मोटारमन मानसिंह यांना याप्रकरणी जबाबदार धरत निलंबित करण्याचा निर्णय घेतला.