उत्तर प्रदेशातील गोरखपूर रुग्णालयात ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी आतापर्यंत ६० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं देशभरात हळहळ व्यक्त होत असतानाच नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी चीड व्यक्त केली आहे. गोरखपूर रुग्णालयातील घटना हा अपघात नाही तर हत्याच आहे, असा संताप त्यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केला. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांचा हाच अर्थ आहे का, असा सवालही त्यांनी केला.

 

कैलाश सत्यार्थी यांनी आणखी एक ट्विट केले आहे. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी निर्णायक हस्तक्षेप करावा, जेणेकरून दशकभरापासूनची भ्रष्ट आरोग्य व्यवस्था ठिक होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

गोरखपूरमधील बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्याअभावी आतापर्यंत लहान मुलांसह ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आदित्यनाथ यांनी दिले आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह उपस्थित होते. योगींनी अलिकडेच या रुग्णालयाला भेट दिली होती. पण तेथील अडचणींबाबत रुग्णालय प्रशासनाने कोणतीही माहिती दिली नाही, असे सिंह यांनी स्पष्ट केले. या घटनेच्या चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यमंत्री आशुतोष टंडन यांनी दिली. या घटनेनंतर विरोधी पक्षांनी योगी आदित्यनाथ आणि सरकारवर निशाणा साधला आहे. या घटनेला सरकार जबाबदार असून योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी काँग्रेससह बसपने केली आहे. तर मृत मुलांच्या नातेवाईकांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, तसंच राज्यातील गरीब रुग्णांना मुबलक प्रमाणात औषधांचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी समाजवादी पक्षाने केली आहे.