संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सूतोवाच
इटलीच्या फिनमेकॅनिका कंपनीला मिळालेल्या संरक्षण निविदा रद्द करण्यात येतील, असे संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी सांगितले आहे. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर्सच्या खरेदी प्रकरणाशी फिनमेकॅनिका कंपनी संबंधित असून आता या कंपनीलाही काळ्या यादीत टाकण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी सांगितले, की फिनमेकॅनिका व त्यांच्या उपकंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे व त्याबाबतची टिप्पणी कायदा मंत्रालयास पाठवण्यात आली आहे. फिनमेकॅनिका व उपकंपन्यांची भांडवल खरेदी बंद करण्यात आली आहे. सुटय़ा भागांची आयात व निगा दुरुस्ती हे काम कंपनीकडे आधीच दिलेले काम तूर्त कायम ठेवण्यात आले आहे. भांडवली खरेदीचे विनंती प्रस्ताव सरकारने माघारी घेतले असून ते प्रस्ताव टॉर्पेडो व स्कॉर्पिन पाणबुडीसाठी होते. यूपीए काळात त्यातील काही निविदा फिनमेकॅनिकाने मिळवल्या होत्या. एखाद्या कंपनीला काळ्या यादीत टाकल्यानंतर ती कंपनी पुढील अनेक वर्षे संबंधित देशात भांडवल खरेदी करू शकत नाही. जमीन अधिग्रहण करार, निगा-दुरुस्ती करार, सुटय़ा भागांची आयात याबाबत करार झाले असून ते आवश्यक तेथे कायम ठेवले जातील, त्यासाठीही संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रमाणन आवश्यक राहील. ओटोमेलारा ही फिनमेकॅनिकाची कंपनी असून १२७ एमएमच्या त्यांच्या तोफा या नौदल प्रशिक्षण शाळांसह अनेक नौदलतळांवर तैनात केल्या जाणार होत्या. सेलेक्स इएस ही फिनमेकॅनिकाची उपकंपनी रडारचाही पुरवठा करणार होती, ते कोचिन शिपयार्डवरील विमानवाहू युद्धनौकावर बसवले जाणार होते.