बोफोर्स तोफांवरून झालेला गोंधळ निस्तरण्याच्या हेतूने  १५ हजार ७५० कोटी रुपयांच्या ८१४  तोफा खरेदी करण्याचा प्रस्ताव संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी शनिवारी मंजूर केला. या तोफांपैकी ७१४ तोफांचे उत्पादन भारतात केले जाईल तर उर्वरित १०० तोफांची खरेदी बाहेरून करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
सन १९८६ मध्ये बोफोर्स तोफांच्या खरेदी गैरव्यवहारावरून उद्भवलेल्या वादळानंतर भारताच्या लष्कराने गेल्या तीन दशकांत तोफांची खरेदीच केलेली नव्हती. आतापर्यंत तोफांच्या खरेदीसाठी जारी करण्यात आलेल्या सहा निविदा  या ना त्या कारणाने रद्द करण्यात आल्या होत्या. संबंधित कंपन्यांना काळ्या यादीत टाकणे किंवा अन्य काही कारणे त्यामागे होती. परंतु आता मात्र संरक्षणमंत्री पर्रिकर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन या एकूणच प्रकरणाची कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यासाठी पर्रिकर यांनी ‘डिफेन्स अ‍ॅक्विझिशन कौन्सिल’ ची बैठक शनिवारी सकाळी आयोजित केली होती. १५५मिमी/५२ कॅलिबरच्या ८१४ तोफा मिळविण्याचा प्रस्ताव सदर बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला. यासाठी सार्वजनिक तसेच खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत.
दरम्यान, भारतीय हवाई दलासाठी स्वीस बनावटीची १०६ प्रशिक्षणार्थी विमाने खरेदी करण्याच्या निर्णयावरही या बैठकीत मान्यतेची मोहोर उमटविण्यात आली.त्यासाठी ८,२०० कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.