केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर काही केंद्रीय मंत्र्यांच्या स्वीय सचिवांची नियुक्ती करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयाने राखून ठेवला आहे.
मोदींच्या आदेशानुसार मंत्र्यांनी आपल्या स्वीय सचिवांची नियुक्ती करताना कॅबिनेटच्या नियुक्ती समितीची मंजूरी घेणे बंधनकारक आहे. त्यासंदर्भात आदेशपत्र २६ मे रोजी संबंधित विभागांना पाठविण्यात आले होते. या आदेशपत्रातील नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.
त्यामुळे केंद्रात आणि भाजप सरकारमध्ये क्रमांक दोनचे मंत्री असलेल्या खुद्द राजनाथ सिंह यांच्या स्वीय सचिवाची नियुक्ती रखडली आहे. राजनाथ यांच्यासोबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, कायदेमंत्री रविशंकर प्रसाद आणि अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री नजमा हेपतुल्ला यांच्याही स्वीय सचिवांच्या नियुक्तीचा निर्णय पंतप्रधान कार्यालयाकडून राखून ठेवण्यात आला आहे.
याआधी मोदी यांनी सहकारी मंत्र्यांना सुरूवातीलाच कार्यालयीन कर्मचाऱयांची काळजीपूर्वक निवड करण्याच्या स्पष्ट सुचना दिल्या होत्या. राजनाथ सिंह यांनी यूपीए सरकारमधील मंत्री सलमान खुर्शीद यांचे स्वीय सचिव राहिलेले अलोक सिंह यांची निवड केली परंतु, पंतप्रधान कार्यालयाकडून अलोक सिंह यांच्या नियुक्तीचा निर्णय राखून ठेवण्यात आला.
राजनाथ यांच्यासोबत स्मृती इराणी, रविशंकर प्रसाद आणि नजमा हेपतुल्ला यांनी पाठविलेल्या आपल्या स्वीय सचिवांच्या नावांवर पंतप्रधान कार्यालयाने नापसंती दर्शविल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांनी सुचविलेल्या नावांना नियुक्ती समितीकडून मंजूरी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.