सवलतीच्या दरात मिळणारे स्वयंपाकाचे गॅस सिलींडर आता वर्षभरात केव्हाही देण्याच्या निर्णयावर केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी शिक्कामोर्तब केले. याआधी, महिन्याला एकदाच हे सिलींडर घेता येत होते.
याआधी, फेब्रुवारी महिन्यात सवलतीच्या दरातील सिलींडरची संख्या नऊवरून १२ वर वाढविताना ग्राहकाला महिन्यातून एकदाच ते उपलब्ध करण्याचे बंधन तत्कालीन सरकारने घातले होते. या पद्धतीमुळे लोकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. कधी कधी सणावारीच्या दिवसांत एकापेक्षा अधिक सिलींडरची आवश्यकता भासत असे, असे केंद्रीय दूरसंचार आणि कायदामंत्री रविशंकर यांनी सांगितले. या एकूण पाश्र्वभूमीवर लोकांची सोय लक्षात घेऊन एका महिन्यास एका सिलींडरची अट मागे घेण्यात आली असून वर्षभरात लोकांना १२ सिलींडर सवलतीच्या दरात केव्हाही घेता येतील, असे ते म्हणाले.