पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातील पर्यायी विमानात शुक्रवारी रात्री मृत हातबॉम्ब आढळल्याने मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे मोदींच्या अमेरिकी दौऱ्यासाठी एअर इंडियाचे हे विमान पर्यायी विमान म्हणून वापरण्यात येत होते. मात्र, विमानात कोणतीही स्फोटके नसून दहशतवादी विरोधी कारवाईच्या सरावादरम्यान हातबॉम्बचे प्लॅस्टिक आवरण विमानात राहिल्याचे एअर इंडिया प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
सध्या एअर इंडियाकडून बोईंग ७४७-४०० हे विमान मुंबई-हैदराबाद-जेद्दा हवाई वाहतुकीसाठी वापरले जात होते. यावेळी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये हातमॉम्बसदृश वस्तू सापडली. जेद्दामध्ये विमान पोचल्यानंतर कर्मचाऱ्यांनी ही बाब सुरक्षा व्यवस्थेला कळविली. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विमानाचा ताबा घेऊन संपूर्ण तपासणी केली. आता भारतीय सुरक्षा यंत्रणा या घटनेची चौकशी करत आहेत. 
मात्र, एअर इंडिया प्रशासनाने हे प्रकरण तितकेसे गंभीर नसल्याचे सांगितले. विमानात कोणतीही स्फोटके नसून कमर्चाऱ्यांना विमानतळावरील सुरक्षा दलांकडून दहशतवादी विरोधी कारवाईच्या सरावादरम्यान हातबॉम्बवरील प्लॅस्टिकचे आवरण सापडल्याचे सांगण्यात आले. त्यापासून कोणताही धोका नसल्याचेही एअर इंडियाकडून स्पष्ट करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.