काँग्रेस आत्महत्येच्या दिशेने वाटचाल करत असून हा पक्ष दिशाहीन झाला आहे. समोर खड्डा दिसूनही तुम्ही त्याच मार्गावर चालणार असाल तर मी तुमच्यासोबत येणार नाही. मला खड्ड्यात पडायचे नाही असे सांगत गुजरातमधील काँग्रेस नेते शंकरसिंह वाघेला यांनी पक्षनेतृत्वावरच हल्लाबोल केला आहे. मी जुलैमध्ये राहुल गांधींची भेट घेणार असून त्यांच्याकडे माझ्या भावना व्यक्त करणार असल्याचे वाघेला यांनी सांगितले.

गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून काँग्रेसमध्येही असंतोष खदखदू लागला आहे. काँग्रेसमधील नेते शंकरसिंह वाघेला यांनी शनिवारी अहमदाबादमध्ये समर्थकांना संबोधित केले. वाघेला यांचे सुमारे ३ हजार समर्थक या कार्यक्रमात हजर होते. या माध्यमातून वाघेला यांनी शक्तिप्रदर्शनच केले. वाघेला म्हणाले, काँग्रेसची आत्महत्येच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारी करणे गरजेचे आहे. पण पक्षातील काही नेते माझीच हकालपट्टी करण्याच्या मागे लागले आहेत असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसच्या नेतृत्वाकडे दूरदृष्टीचा अभाव असून पक्ष नेतृत्वाची लढण्याची मानसिकताच नाही असे वाघेला यांनी सांगितले. तुम्ही शस्त्र टाकून दिली आणि लढण्याची वृत्तीच दाखवली नाही तर तुम्ही भाजपकडून हरण्याची सुपारीच घेतली असे जनतेला वाटेल असेही वाघेला म्हणालेत. माझ्याकडे दांडगा अनुभव असूनही पक्षाने मला महत्त्व दिले नाही. मग मी त्यांच्यासोबत आनंदात कसा राहू शकेन असा सवालही त्यांनी समर्थकांना विचारला. २०१७ मधील निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक असेल असे भावनिक विधानही त्यांनी केले. पक्षनेतृत्वाकडे मी माझा संदेश पोहोचवला आहे. मी त्यांची भेटदेखील घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुजरातमध्ये भाजपविरोधात लाट आहे. ओबीसी, पाटीदार समाज, दलित असे सर्व वर्ग भाजपवर नाराज आहे. काँग्रेससाठी अनुकूल वातावरण असूनही निवडणुकीची तयारी केली जात नाही अशी टीकाही त्यांनी केली. उत्तर प्रदेशमध्ये पराभव झाल्यावर तुम्ही गुजरात निवडणूक गांभीर्याने घेण्याची गरज होती. निवडणुकीच्या एक वर्षापूर्वीच काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणे गरजेचे होते असे त्यांनी सांगितले. शंकरसिंह वाघेला हे पूर्वी भाजपमध्येच होते. पण भाजपने डावलल्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता या निवडणुकीत त्यांची भूमिका काय असेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे.