मूळचा केरळचा आणि आयसिससाठी काम करणारा दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये ठार झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे. हाफेसुद्दीन ठेके कोलेतह असे या दहशतवाद्याचे नाव आहे. त्याने केरळ सोडले आणि अफगाणिस्तानमध्ये जाऊन आयसिसमध्ये सहभागी झाला होता. अफगाणिस्तानच्या नानगरहार या जिल्ह्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे. या माहितीला भारतीय गुप्तचर विभागाने दुजोरा दिला आहे. त्याच्या कुटुंबियांना ही माहिती टेलिग्राम इंस्टंट या अॅपवरुन मिळाली. गेल्या काही वर्षांपासून केरळ राज्यातून आयसिसमध्ये २५ जण गेल्याची माहिती गुप्तचर विभागाकडे आहे. त्यापैकी हाफेसुद्दीन एक होता. इस्लामी राज्य यावे यासाठी आपण हे काम करत आहोत असे त्याने आपल्या कुटुंबियांना सांगितले होते. त्याच्या मृत्यूची बातमी त्याच्यासोबत गेलेल्या मित्रानेच कुटुंबियांना दिली. ‘तुमच्या मुलाला हौतात्म्य मिळाले आहे. आता त्याला स्वर्गप्राप्ती होणार, आम्ही देखील असा क्षण आमच्या आयुष्यात कधी येईल याची वाट पाहत आहोत’, असे त्याने टेलिग्राम इंस्टंटवर म्हटले होते. हाफेसुद्दीनचे कुटुंबीय केरळातील पदन्ना येथे राहते. हाफेसुद्दीन २५ वर्षांचा होता.

जेव्हा तो अफगाणिस्तानमध्ये गेला होता, तेव्हा त्याने आपल्या कुटुंबियांना सांगितले की मी येथे पोहचलो आहे. ही जागा खूप छान आहे. येथे कर नाही, शरिया कायदा आहे, कुणी मला पकडू शकत नाही, हा स्वर्ग आहे असे त्याने म्हटले होते.  तिथे त्याचा ड्रोन हल्ल्यामध्ये मृत्यू झाला असावा अशी शक्यता गुप्तचर विभागाने सांगितली आहे. मागील आठवड्यामध्ये आयसिसच्या २४ दहशतवाद्यांना अफगाणिस्तानच्या सैन्याने ठार केले होते. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला असावा असे गुप्तचर विभागातील सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले. केरळमधून आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले सर्व तरुण हे उच्चशिक्षित होते. इंजिनिअर, हॉटेल मॅनेजमेंट अशा विद्याशाखांचा अभ्यास करुन ते अफगाणिस्तानला गेले आहेत. अफगाणिस्तानला गेल्यानंतर हाफेसुद्दीनने आपल्या आईला फोन केला होता. आता आपली भेट स्वर्गातच होईल असे तो म्हटल्यावर मला रडू कोसळले होते असे त्याच्या आईने म्हटले. ‘माझा मुलगा मला काफिर म्हणतो’ असे त्याच्या वडिलांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले. मला त्याचा मृतदेह देखील पाहण्याची इच्छा नाही. मी एक भारतीय आहे असे त्यांनी म्हटले.