काही गुंडांनी चालत्या ट्रेनमधून फेकल्यामुळे एक पाय गमावलेल्या माजी राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू अरुनिमा सिन्हा हिने नवीन इतिहास रचला आहे. जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी ती पहिली अपंग भारतीय ठरली आहे.
टाटा समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या इको एव्हरेस्ट मोहिमेअंतर्गत अरुनिमा मंगळवारी सकाळी १०.५५ ला ८ हजार ८४८ मीटर उंचीच्या हिमालयाच्या सर्वोच्च टोकावर पोहोचल्याची माहिती नेपाळ पर्यटन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
उत्तर प्रदेशची रहिवासी असलेली अरुनिमा १२ एप्रिल २०११ रोजी लखनऊ येथून दिल्लीला जात असताना काही गुंडांनी तिला पद्मावती एक्स्प्रेसमधून बाहेर फेकले होते. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अरुनिमाच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी डावा पाय गुडघ्यापासून काढून टाकला.
या मोहिमेवर निघण्याआधी वृत्तवाहिन्यांशी बोलताना अरुनिमा हिने सांगितले की, मी रुग्णालयात असताना प्रत्येकाला माझी काळजी वाटत होती. मात्र माझ्याकडे दयेने बघू नये यासाठी काहीतरी वेगळे करण्याचा विचार माझ्या मनात घर करून होता. त्यामुळे जेव्हा एव्हरेस्ट मोहिमेबद्दल माहिती मिळवली, तेव्हा माझा भाऊ आणि प्रशिक्षकांना सांगितले. त्यांनीही मला प्रोत्साहन दिल्याचे तिने सांगितले.
गेल्या वर्षी उत्तरकाशी येथील शिबिरात अरुनिमा टाटा स्टील अॅडव्हेंचर फाऊंडेशनशी जोडली गेली. तिथे एव्हरेस्टवर चढणाऱ्या पहिली भारतीय महिला असणाऱ्या बाचेंद्री पाल यांनी तिला प्रशिक्षण दिले होते. गेल्या वर्षी ६ हजार ६२२ मीटर उंचीचे लडाखमधील छामसेर कांग्री हे उंच शिखर तिने काबीज केले. मात्र एव्हरेस्ट सर करण्याची तिची इच्छा होती.
पहिल्या जुळ्या भगिनी
देहराडूनच्या ताशी आणि नॅन्सी मलिक या २१ वर्षीय जुळ्या भगिनींनी हिमालय सर करून पहिल्या जुळ्या होण्याचा मान मिळवला. एव्हरेस्ट सर करणाऱ्या या महिलांमध्ये सौदी अरेबिया तसेच पाकिस्तानच्या महिलांचाही समावेश होता. या महिलांनी त्यांच्या देशातर्फे प्रथमच हिमालय सर केला होता.
संग्रहित लेख, दिनांक 22nd May 2013 रोजी प्रकाशित
अपंगत्वावर मात करीत अरुनिमाकडून एव्हरेस्ट सर !
काही गुंडांनी चालत्या ट्रेनमधून फेकल्यामुळे एक पाय गमावलेल्या माजी राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू अरुनिमा सिन्हा हिने नवीन इतिहास रचला आहे. जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी ती पहिली अपंग भारतीय ठरली आहे.
First published on: 22-05-2013 at 03:38 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Handicap arunima sinha became indias first woman to conquer everest