तुफान पावसामुळे पूरस्थिती; वाहतूक व्यवस्था कोलमडली

एरवी दिल्लीच्या रस्त्यांना वाहतूककोंडी काही नवीन नाही. त्याची कारणेही वेगवेगळी असतात. मात्र, बुधवारी तुफानी पावसाने राजधानीला झोडपून काढल्याने रस्तोरस्ती पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूककोंडी तर झालीच शिवाय रेल्वे व हवाई वाहतुकीची व्यवस्थाही पूर्णत कोलमडून पडली होती. सकाळी तीन तासांत तब्बल ६० मिमी पाऊस राजधानीवर बरसला!

गेल्या काही दिवसांपासून दिल्ली व परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. बुधवारी मात्र तीन तासांतच ६० मिमी पाऊस झाल्याने रस्तोरस्ती पाणी साचल्याचे चित्र होते. पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक रस्ते पाण्याने तुंबले होते.  विमानतळाजवळील धौला कुँआ, आश्रम चौक, बारापुल्ला उड्डाणपूल, मथुरा रोड, लाजपत नगर, राजा गार्डन यासारखे परिसर जलमय झाले होते. काही ठिकाणी गुडघाभर पाणी होते, तर काही ठिकाणी चारचाकी बुडण्याएवढे पाणी साचले होते. परिणामी वाहतूक ठप्पच झाली. सगळीकडे काही किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या. बहुतेक विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले. उतरू पाहणारया काहींना परत जयपूरकडे वळविण्यात आले.

सकाळच्या तीन तासांत सुमारे ६० मिमीएवढा पाऊस बरसला. दिल्लीमध्ये क्वचितच धुव्वांधार बसरतो, पण या मोसमातील ही तिसरी वेळ आहे. दिल्लीच नव्हे, तर गुरगाव उर्फ गुरूग्राम, फरिदाबाद, नोएडा यासारख्या लगतच्या परिसरांमध्येही सर्वत्र रांगांचे दृश्य होते. मागील वेळी दिल्लीसारखी परवड गुरुग्रामची झाली होती.

केरींकडून कौतुक की वाभाडे?

आयआयटी दिल्लीत पोहोचलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी एवढय़ा पावसातही विद्यार्थी वेळेवर हजर राहिल्याने ‘तुम्ही येथे बोटीनेच आला असाल’, असा सवाल करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पावसामुळे केरी यांना प्रार्थनास्थळांना भेट देण्याचा बेतही रहित करावा लागला. केरी यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून काढलेल्या उद्गारांचे समाजमाध्यमांवर मात्र वेगवेगळे अर्थ काढले जात होते. केरी यांनी बेफाम पावसामुळे बेहाल झालेल्या दिल्लीच्या वाहतूकव्यवस्थेचे वाभाडे काढल्याचा कयास काहींनी केला तर काहींनी त्यांचे हे उद्गार दिल्लीच्या व्यवस्थेचे कौतुक करणारेच होते, असा अर्थ काढला.